दिंडोरीरोडला वाहनतळाचे स्वरूप; अपघातांत वाढ
By Admin | Updated: November 21, 2015 23:58 IST2015-11-21T23:57:56+5:302015-11-21T23:58:21+5:30
बाजार समितीच्या वाहनांची पडते भर

दिंडोरीरोडला वाहनतळाचे स्वरूप; अपघातांत वाढ
पंचवटी : दिंडोरीरोड ते महालक्ष्मी चित्रपटगृहासमोरील रस्त्यावर दिवसभर चारचाकी, तसेच प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी राहत असल्याने या रस्त्याला वाहनतळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भर वाहतुकीच्या रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी तर होतेच, शिवाय अपघातांतदेखील वाढ झाली आहे.
विशेष म्हणजे दिंडोरी नाका परिसरात वाहतूक शाखेने वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात केले असले तरी या कर्मचाऱ्यांचे रस्त्यावरच उभ्या राहणाऱ्या चारचाकी व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांकडे लक्ष वेधले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दिंडोरीरोडवर कृषी उत्पन्न बाजारसमिती असून सायंकाळच्या सुमाराला तर शेकडा वाहने भाजीपाला घेऊन बाजारसमितीत येत असतात. भाजीपाला विक्री केल्यानंतर वाहनचालक सदर वाहने रस्त्यावरच उभी करतात. रस्त्यावर उभी राहणारी वाहने व त्यातच भाजीपाल्याची वाहने यामुळे वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडते.
गेल्या अनेक दिवसांपासून अशी परिस्थिती असली तरी याकडे वाहतूक शाखेचे दुर्लक्ष होत असल्याने सध्या तरी या रस्त्याला वाहनतळाचे स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र दिसून येते. रस्त्यावरच उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे व त्यातच वेगाने दुचाकी चालविणाऱ्या तरुणांमुळे रस्त्याने पायी जाणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)