दिलीप म्हैसेकर यांनी पदभार स्वीकारला
By Admin | Updated: August 19, 2016 00:53 IST2016-08-19T00:50:57+5:302016-08-19T00:53:54+5:30
मुक्त विद्यापीठ : माणिकराव साळुंखे यांना निरोप

दिलीप म्हैसेकर यांनी पदभार स्वीकारला
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याकडे गुरु वारी कुलगुरूपदाचा पदभार सोपविण्यात आला. डॉ. साळुंखे यांनी म्हैसेकर यांच्याकडे सूत्रे सुपूर्द केली.
मुक्त विद्यापीठाचे १४ वे कुलगुरू म्हणून डॉ. माणिकराव साळुंखे यांनी १९ आॅगस्ट २०१४ रोजी पदभार स्वीकारला होता. मात्र अवघ्या दोन वर्षांतच त्यांना राजीनामा द्यावा लागला. कुलपती तथा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी साळुंखे यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली. आज दुपारी कुलगुरू डॉ. साळुंखे यांनी कुलगुरू पदाची सूत्रे डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याकडे सुपूर्द केली.
विद्यापीठाच्या शैक्षणिक सभागृहात झालेल्या कार्यक्र मात विद्यापीठाचे कुलसचिव दिनेश भोंडे यांनी प्रास्ताविक केले. कुलगुरू डॉ. साळुंखे यांचा शाल, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच दिनेश भोंडे यांनीही अलीकडेच कुलसचिव पदाचा पदभार स्वीकारल्याबद्दल उपकुलसचिव सुवर्णा चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले.
सत्काराला उत्तर देताना डॉ. माणिकराव साळुंखे म्हणाले, मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कौशल्यधिष्ठित शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना स्कील्बेस एज्युकेशन देण्याची मनोमन इच्छा होती. मात्र कौशल्यधिष्ठित शिक्षणावर अधिक काम करता आले नाही, अशी खंत प्रा. डॉ. साळुंखे यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)