नाशिकच्या संमेलनातून नवी दिशा मिळण्याची मान्यवरांना आशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:46 IST2021-02-05T05:46:49+5:302021-02-05T05:46:49+5:30
नाशिक : नाशिकच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली संशोधक आणि विज्ञान कथालेखकाची निवड ही एकूणच साहित्य क्षेत्राला ऊर्जा देतानाच ...

नाशिकच्या संमेलनातून नवी दिशा मिळण्याची मान्यवरांना आशा
नाशिक : नाशिकच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली संशोधक आणि विज्ञान कथालेखकाची निवड ही एकूणच साहित्य क्षेत्राला ऊर्जा देतानाच नवी दिशा देणारी ठरणार असल्याचा विश्वास नाशिक जिल्ह्यातील प्रथितयश साहित्यिक आणि विज्ञानप्रेमी रसिकांना झाला आहेे.
नाशिकला होत असलेले तिसरे साहित्य संमेलन हे संपूर्ण राज्यातील विज्ञानवादी, नवविचार मांडणाऱ्या साहित्याला दिशा देणारे ठरेल, अशी आशा या निमित्ताने निर्माण झाली आहे. त्याबाबत नाशिकचे रसिक, साहित्यिक आणि विज्ञानप्रेमींनी या निर्णयाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले आहे.
मराठी साहित्यातील विज्ञान वाङ्मय हे काहीसे दुर्लक्षित होते. मात्र, डॉ. नारळीकर यांची संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याने त्याला चालना मिळेल. त्यांची निवड ही नाशिककरांसाठी भूषणावह बाब आहे.
गो. तु. पाटील, साहित्यिक
------------
साहित्याच्या क्षेत्रातील विज्ञानवादी दृष्टिकोन आणि विज्ञान साहित्याचा हा सन्मान आहे. डॉ. नारळीकर यांच्या निवडीने खूप आनंद झाला असून, नाशिकमध्ये होणारे हे साहित्य संमेलन निश्चितच वेगळे आणि दर्जेदार हाईल, असा विश्वास वाटतो.
प्रकाश होळकर , कवी
प्रथमच एक मराठी विज्ञान कथालेखक साहित्यिक संमेलनाध्यक्ष होणार असल्याचा आनंद आहे. साहित्य अकादमीचा पुरस्कारदेखील त्यांना मिळालेला असल्याने हे संमेलन वेगळी दिशा देणारे ठरेल, असा विश्वास वाटतो.
प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, साहित्यिक
------
वैज्ञानिक साहित्यिक संमेलनाध्यक्ष म्हणून लाभणे हे निश्चितच खूप खास आहे. कोरोनानंतरच्या विश्वात वैज्ञानिक बाबींचे महत्त्व अधोरेखित झाले असून त्याच पार्श्वभूमीवर डॉ. नारळीकर यांची झालेली निवड अत्यंत स्वागतार्ह निर्णय आहे.
जयप्रकाश जातेगावकर, अध्यक्ष, लोकहितवादी मंडळ
----------
मराठीतील विज्ञान साहित्याला लोकप्रिय करण्यात डॉ. नारळीकर यांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांच्या साहित्याची प्रशंसा दुर्गाबाई भागवत यांनी कराडच्या संमेलनात केली होती. त्यांच्या निवडीमुळे वैज्ञानिक साहित्याला चालना मिळू शकेल, असा विश्वास वाटतो.
गिरीश पिंपळे, खगोल अभ्यासक
-------
डॉ. नारळीकर यांच्यासारखा जागतिक किर्तीचा संशोधक आणि विज्ञान कथालेखक संमेलनाला लाभणे आणि त्यांचे विचार ऐकायला मिळणे ही नाशिककरांसाठी निश्चितच आनंदाची बाब आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे विज्ञान कथेला आणि कथालेखनाचा अधिक प्रसार होईल.
नरेश महाजन, साहित्यिक