रेशन दुकानांमध्ये डिजिटल व्यवहार
By Admin | Updated: June 28, 2017 00:40 IST2017-06-28T00:04:07+5:302017-06-28T00:40:52+5:30
त्र्यंबकेश्वर : यापुढे रेशन दुकानांमध्ये डिजिटल ई-पॉस मशीनच्या साहाय्याने धान्य व इतर मालाची विक्री होणार असल्याचे दुकानदारांच्या बैठकीत जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके यांनी सांगितले.

रेशन दुकानांमध्ये डिजिटल व्यवहार
लोकमत न्यूज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : यापुढे रेशन दुकानांमध्ये डिजिटल ई-पॉस मशीनच्या साहाय्याने रास्त भावाने धान्य व दुकानातील इतर मालाची विक्री होणार असल्याचे तहसीलदार कार्यालयात सर्व दुकानदारांच्या आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके यांनी सांगितले. यावेळी नरके यांनी दुकानदारांना स्पष्ट बजावले की, ई-पॉस मशीन बिघडले किंवा बंद पडले तर त्याला जबाबदार दुकानदार राहतील. त्यामुळे मशीनचा वापर योग्य रीतीने समजावून घ्या. यावेळी कंपनीच्या तांत्रिक अधिकाऱ्यांनी दुकानदारांना मशीन आॅपरेटिंगचे प्रशिक्षण दिले. १ जुलैपासून (३० जूनच्या रात्रीनंतर) या मशीन कार्यरत होतील. या मशीन थेट दिल्लीला जोडलेल्या आहेत. मशीनमधील संपूर्ण माहिती दिल्लीला केंद्रीय पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिसणार आहे. याशिवाय स्थानिक तहसीलदार कार्यालय आदी कोणालाही पाहता येईल. काही जुन्या दुकानदारांना हे समजले नसल्यास त्यांना दोनतीन वेळा समजावून सांगण्यात येईल. नाहीच जमले तर राजीनामाच द्यावा लागणार आहे. या बैठकीस तहसीलदार महेंद्र पवार, निवासी नायब तहसीलदार मोहन कनोजे, जिल्हा तांत्रिक अधिकारी स्वप्नील चौरे, पुरवठा विभागाचे प्रकाश भट, प्रदीप माळवे, बाळकृष्ण कर्डिले आदी उपस्थित होते.
पारदर्शकता वाढण्यास होणार मदत
लाभार्थी रास्त भाव दुकानात आला की त्याचा अंगठा मशीनवर उमटवेल आणि त्वरित लाभार्थीचा संपूर्ण डाटा पहावयास मिळून त्याला किती धान्य द्यायचे, त्याचे किती पैसे घ्यायचे याबाबतच्या संपूर्ण तपशिलाची पावतीच आॅपरेट होऊन बाहेर येईल. ती पावती फाडून रास्त भाव धान्य दुकानदार लाभार्थी ग्राहकास देऊन धान्य देईल.या पद्धतीने व्यवहार होणार असल्याने पारदर्शकता वाढून धान्य भ्रष्टाचाराला आळा बसेल, असे नरके यांनी सांगितले.