शेलू नदीवरील पाणी अडविण्यास अडचण
By Admin | Updated: October 6, 2015 22:08 IST2015-10-06T22:05:39+5:302015-10-06T22:08:08+5:30
शिरसाणे : प्लेट्स पुरविण्याची मागणी

शेलू नदीवरील पाणी अडविण्यास अडचण
चांदवड : चांदवड तालुक्यातील शिरसाणे येथील शेलू नदीवरील साठवण बंधाऱ्याच्या प्लेट्स पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने व काही प्लेट्स वाकड्या झाल्याने प्लेट्स मिळाव्यात व बंधाऱ्याची डागडुजी करावी अशी मागणी बापू सोनवणे, शिवाजी डावखर, एकनाथ चव्हाण, दिनकर घोलप व ग्रामस्थांनी तहसीलदार मनोज देशमुख, गटविकास अधिकारी भूपेंद्र बेडसे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या पाच वर्षांपासून शेलू नदीला पाण्याचा थेंबही नव्हता निसर्गाच्या कृपेने नदीला पाणी आले. शेतकरी आनंदी झाले. शासन म्हणते पाणी अडवा, पाणी जिरवा आता पाणी आल्यावर ते पाणी अडवता येत नाही. या बंधाऱ्याच्या प्लेट्स पुरामुळे वाहून गेल्याने पाणी थांबत नाही. कारण बंधाऱ्याला पाणी अडविण्यासाठी प्लेट्सच नाहीत. तरी प्रशासनाने जागेवार येऊन शिरसाणे येथील गायरान वस्ती बंधारा व बुरखुल वस्तीजवळील बंधारा या दोन्ही साठवण बंधाऱ्याची पाहणी करून बंधाऱ्याची डागडुजी नवीन प्लेट्स बसविण्यात याव्यात. तरी चार ते पाच दिवसात बंधाऱ्याला प्लेट्स बसवून न मिळाल्यास परिसरातील शेतकरी उपोषण करतील असा इशारा देण्यात आला. या निवेदनावर शांताराम घुले, राजू डावखर, प्रभाकर देशमाने, गणेश डावखर, नंदू डावखर, विजय केदारे, विनोद केदारे, राजू केदारे यांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)