सिडकोने घरासाठी वृक्षांसह भूखंड दिल्याने अडचण
By Admin | Updated: January 18, 2016 22:41 IST2016-01-18T22:40:33+5:302016-01-18T22:41:11+5:30
कुचंबणा : झाडे तोडण्याची महापालिकेकडे मागणी

सिडकोने घरासाठी वृक्षांसह भूखंड दिल्याने अडचण
नाशिक : सिडको प्रशासनाने सोडतीद्वारे भाडेतत्त्वावर भूखंड विकला आहे. तथापि, या भूखंडावरील झाडे तोडू दिली जात नाही आणि पालिका न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याने कार्यवाही करीत असल्याने भूखंड घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याची मोठी अडचण झाली आहे. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या या कर्मचाऱ्याला घर बांधणे जिकिरीचे झाले आहे.
पाटबंधारे खात्यात चतुर्थश्रेणी असलेल्या बाळानाथ हरी अहिरे यांच्याबाबतीत हा प्रकार घडला आहे. १६ एप्रिल २०१० रोजी सोडतीद्वारे त्यांना भूखंड मिळला. त्रिमूर्ती चौकाजवळील शिवशक्तीनगर येथील सी - १ येथे भूखंड क्रमांक चार हा सिडकोने विकला आहे. मात्र, त्यावर तीस ते पस्तीस वर्षांपासूनची जुनी विविध प्रजातीची झाडे आहेत. असे असताना सिडको प्रशासनाने हा भूखंड विकला. सदरचा भूखंड झाडे तोडून मोकळा करून द्यावा अन्यथा आपल्याला दुसरा भूखंड बदलून द्यावा यासाठी अहिरे यांनी सिडको प्रशासनाला वारंवार निवेदने दिली आहेत. मात्र, तुम्ही भूखंड ताब्यात घ्यावा अन्यथा भरणा केलेली ५० टक्के रक्कम कापून घेऊ असे सिडकोतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आपण चालू वर्षी निवृत्त होणार असून, आता आपल्याकडे घरच नाही, भूखंड असून घर बांधता येत नाही. अशी अवस्था आहे. मग सिडको काय डोळे झाक करून भूखंड विक्री करताच आहे, असा प्रश्न अहिरे यांनी केला आहे.