हॉटेल व्यावसायिक, मेसचालकांपुढे संपामुळे अडचण
By Admin | Updated: June 5, 2017 00:54 IST2017-06-05T00:54:13+5:302017-06-05T00:54:45+5:30
नाशिक : राज्यभर सुरू असलेला शेतकऱ्यांच्या संपाचा परिणाम नाशिक शहरावरही झाला आहे.

हॉटेल व्यावसायिक, मेसचालकांपुढे संपामुळे अडचण
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राज्यभर सुरू असलेला शेतकऱ्यांच्या संपाचा परिणाम नाशिक शहरावरही झाला असून, यापुढील काळात भाजीपाला उपलब्ध न झाल्यास शहरातील हॉटेल व्यावसायिक तसेच मेसचालकांपुढे आपल्या मेंबर्सना दररोज काय द्यायचे, हा प्रश्न उभा ठाकला आहे.
गुरुवारी संपाच्या पहिल्या दिवशी भाजीपाल्याची फारशी टंचाई जाणवली नसली तरी अनेक हॉटेल व्यावसायिकांकडे ‘कोल्ड स्टोअरेज’ची सुविधा असल्याने आगामी चार ते पाच दिवस पुरेल एवढ्या भाजीपाल्याची साठवणूक करण्यात आली आहे. उन्हाळी सुट्या पूर्णपणे संपल्या नसल्याने तसेच अनेकांच्या घरी सुटीसाठी आलेले पाहुणे दिवसातील एकवेळचे जेवण हॉटेलमध्ये करत असल्याने हॉटेलमध्ये ग्राहकांची कायम वर्दळ दिसून येत आहे. त्याच तुलनेत मात्र शहरातील मेस मेंबर्सना सुट्या असल्यामुळे आपल्या गावी गेलेले आहेत. परिणामी मेस व्यवसायात फार मोठ्या प्रमाणात उलाढाल होत नसल्याचे चित्र शहरात बघायला मिळते.
मेसमध्ये विद्यार्थी सध्या सुटीमुळे येत नसले तरी औद्योगिक वसाहतीत जाणारे कामगार तसेच विविध आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींकडून मात्र दररोज डब्यात वेगवेगळ्या भाज्या देण्याचा आग्रह असल्याने यापुढील काळात संप कायम राहिल्यास मेस मेंबर्सना डब्यात कुठली भाजी द्यायची, हा प्रश्न कायम असला तरी अनेक मेसचालकांनी विविध डाळी, काबुली चण्यांसह कडधान्यांच्या उसळ आणि वरण देण्याचा पर्याय खुला ठेवला आहे.