गुरेवाडीला डिझेल चोरट्यांना अटक
By Admin | Updated: December 12, 2015 22:58 IST2015-12-12T22:57:14+5:302015-12-12T22:58:12+5:30
शोध : वाहनाच्या क्रमांकावरून एमआयडीसी पोलीस संशयितांपर्यंत

गुरेवाडीला डिझेल चोरट्यांना अटक
सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर रात्रीच्या वेळी उभ्या राहणाऱ्या मालट्रकमधून डिझेलची चोरी करून पळालेल्या चोरट्यांना सिन्नर एमआयडीसी पोलिसांनी मोठ्या शिताफीने चोवीस तासाच्या आत जेरबंद केले. चोरीसाठी वापरलेल्या वाहनाच्या क्रमांकावरून पोलिसांना संशयित चोरट्यांना गजाआड करण्यात यश आले.
गुरुवारी रात्री महालक्ष्मी हिवरा (ता. नेवासा, जि. अ.नगर) येथील ट्रकचालक देवीदास बढे यांनी झोप येत असल्याने रात्री त्याच्या ताब्यातील मालट्रक (क्र. एमएच २० डीई २१३३) महामार्गावरील गुरेवाडी शिवारात श्री स्वामी समर्थ पेट्रोलपंपाच्या आवारात उभा करून ट्रकमध्ये झोपी गेले. यावेळी तीन चोरटे त्यांच्या ट्रकजवळ आले. त्यांनी डिझेल टाकीच्या खालच्या बाजूचा नट खोलून डिझेल चोरण्यास प्रारंभ केला. यावेळी पेट्रोलपंपावर रात्रपाळीला असलेल्या मनियार नावाच्या कर्मचाऱ्याला संशय आल्याने त्याने तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फोन केला. पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी तातडीने जवळच राहणारे पोलीस हवालदार देवीदास लाड यांना घटनेची माहिती दिली.
हवालदार लाड यांनी तत्काळ पेट्रोलपंपावर धाव घेतली असता तोपर्यंत चोरट्यांनी ट्रकमधील
सुमारे २५ लिटर डिझेल चोरले होते. चोरट्यांनी डिझेलच्या ट्रमसह
टाटा मॅक्स- छोटा हत्ती (क्र. एमएच १५ एवाय १२५७) मधून नाशिकच्या दिशेने पळ काढला. लाड यांनी पेट्रोलपंपावरील दोन कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन त्यांचा नाशिकरोडपर्यंत पाठलाग केला. मात्र चोरट्यांनी कारला कट मारून पळून जाण्यात यश मिळविले.
क्रमांकावरून सदर वाहन इंदिरानगर (वडाळा), नाशिक भागातील असल्याची खात्री पोलिसांना पटल्याने शुक्रवारी पोलीस निरीक्षक सपकाळे यांनी हवालदार लाड, डी. एन. खतीले, तुषार मरसाळे, गौरव सानप, सुनील जाधव यांचे पथक वडाळा व इंदिरानगर भागात तपासासाठी रवाना केले.
या पथकाने संशयित आरोपी विशाल विलास वाघचौरे (२३), रा. कलानगर, इंदिरानगर नाशिक, अझर निशार शेख (२४) व शौकत सय्यद इब्राहीम (२०) (दोघेही, रा. वडाळा, नाशिक) यांना ताब्यात घेतले. संशयित डिझेल चोरट्यांना न्यायालयात उभे केले असता, त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सपकाळे अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)