पेट्रोलने गाठली नव्वदी, डिझेल ७७.४८ रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 00:48 IST2018-09-17T00:47:51+5:302018-09-17T00:48:09+5:30
शहरात इंधनाच्या वाढत्या दरांचा भडका उडाला आहे. नाशिकमध्ये रविवारी (दि.१६) पेट्रोलच्या किंमती ८९.७२ रुपयांपर्यंत पोहोचल्या असून डिझेलचे दर ७७.४८ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

पेट्रोलने गाठली नव्वदी, डिझेल ७७.४८ रुपये
नाशिक : शहरात इंधनाच्या वाढत्या दरांचा भडका उडाला आहे. नाशिकमध्ये रविवारी (दि.१६) पेट्रोलच्या किंमती ८९.७२ रुपयांपर्यंत पोहोचल्या असून डिझेलचे दर ७७.४८ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. एकीकडे पेट्रोलच्या किमती सातत्याने वाढत असताना शहरातील वेगवेगेळ््या पेट्रोल पंपावर वेगवेगळ्या दराने पेट्रोल विकले जात आहे. पेट्रोल वाहतूक खर्चातील तफावतीमुळे हा फरक असला तरी बहुतांश पेट्रोल पंपावर निर्धारित किमती पेक्षा २० ते २५ पैसे अधिक किमतीने पेट्रोल विक्री होत असल्याची तक्रार ग्राहकांकडून होत आहे. नाशिकमध्ये तेल कंपन्यांनी निर्धारित केलेल्या किमतीप्रमाणे रविवारी ८९.७२ रुपये पेट्रोलचे दर असताना काही पेट्रोल पंपावर ८९.९८ रुपये दराने पेट्रोलची विक्री होत असल्याचे ग्राहकांनी सांगितले. तसेच ग्राहकांना रोज बदलणाऱ्या किमती माहिती व्हाव्या यासाठी सर्व पेट्रोल पंपचालकांना पेट्रोलचे बदललेले दर दर्शनी भागात लावण्याच्या सूचना असतानाही बहुतांश पेट्रोलपंप चालकांनी अशाप्रकारे फलक लावणे टाळलेले आहे.
अनेक पेट्रोलपंपांवर इंधन भरण्यासाठी कॅशलेस व्यवहार करण्यासाठी सहकार्य केले जात नसून ग्राहकांना शंभरच्या पटीत पेट्रोल भरण्यास सांगितले जात असून, लिटरच्या प्रमाणात पेट्रोल भरण्यात अडचणीचा सामना करावा लागत असल्याने ग्राहकांकाडून पेट्रोलच्या वाढत्या किमतींवरून सरकारविरोधात रोष पसरत असतानातच वितरण प्रणालीविषयीही ग्राहकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
ग्राहकांमध्ये संताप
संपूर्ण देशभरात इंधन दरवाढीविरोधात संताप व्यक्त होत असताना नाशिकमध्येही इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. ग्राहकांना पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेसह सुमारे २१ विरोधी पक्षांनी एकत्र येऊन केंद्र सरकार विरोधात देशव्यापी आंदोलन करीत भारतबंद पुकारल्यानंतरही इंधनाच्या किमतीमध्ये सातत्याने होणारी वाढ सुरूच आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून व संघटनांकडून सरकारवर टीकेची झोड उठवली जात असताना सामान्य नाशिककरांकडूनही सरकारविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.