डिझेल चोरणाऱ्या टोळीतील एकास अटक
By Admin | Updated: March 7, 2017 23:45 IST2017-03-07T23:45:35+5:302017-03-07T23:45:53+5:30
सिन्नर : सिन्नर-शिर्डी मार्गावर ट्रकमधून डिझेलची चोरी करताना एका संशयितास वावी पोलिसांनी रंगेहात पकडले, तर अंधाराचा फायदा घेऊन चार जण पसार झाले.

डिझेल चोरणाऱ्या टोळीतील एकास अटक
वावी : बोलेरो जीपसह २१ ड्रम व चोरीचे साहित्य जप्त
सिन्नर : सिन्नर-शिर्डी मार्गावर ट्रकमधून डिझेलची चोरी करताना एका संशयितास वावी पोलिसांनी रंगेहात पकडले, तर अंधाराचा फायदा घेऊन चार जण पसार झाले. पाथरे शिवारात नाशिक हद्दीलगत नाकाबंदी करण्यात येणाऱ्या ठिकाणी रविवारी पहाटे हा प्रकार घडला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकशेजारी बोलेरो जीप (एमएच १५, सीडी ९७५५) उभी करून डिझेल चोरी करण्यात येत होती. यावेळी रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलीस वाहनाला पाहून चोरट्यांनी पळ काढला. पोलिसांनी जीपचा पाठलाग सुरू केला. यावेळी जीप एका खड्ड्यात अडकली. टोळीतील पाचही जणांनी उड्या टाकून अंधाराचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला. यातील विकी बबन ठमके (१९, रा. गोंदवणी रोड, श्रीरामपूर, जि. अहमदनगर) या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले. उर्वरित चार जण पसार झाले. त्याच्याकडून डिझेल चोरीसाठी वापरण्यात आलेली बोलेरो जीप, ३५ लिटर क्षमतेचे २१ रिकामे ड्रम, रबरी नळ्या, लोखंडी दांडे, दोरखंड, दगड असे साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे, हवालदार कैलास आवारी, हनुमंता कांबळे, संदीप शिंदे, अरुण केदारे, व्ही. एस. खेडकर, पी. टी. उंबरकर, एम. आर. चव्हाण या पोलीस पथकाने सदर कामगिरी केली. ताब्यात घेतलेल्या संशयितासह अन्य चार संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिन्नर-शिर्डीसह नाशिक-पुणे महामार्गावरही गेल्या अनेक महिन्यांपासून डिझेल चोरीचे प्रकार घडत होते. त्यामुळे अन्य घटनांचाही याच्याशी संबंध आहे काय, याचा पोलीस तपास करीत आहे. (वार्ताहर)