डिझेल स्वस्त झाले, नागरिकांच्या नाकातोंडात पाणी गेले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:11 IST2021-07-09T04:11:16+5:302021-07-09T04:11:16+5:30
नाशिक : महापौर म्हणतात जलनेती करा, नाकात पाणी घाला, पण येथे लोकांच्या नाकातोंडात पाणी गेलेय, रोजगार बुडाला आहे, अशी ...

डिझेल स्वस्त झाले, नागरिकांच्या नाकातोंडात पाणी गेले!
नाशिक : महापौर म्हणतात जलनेती करा, नाकात पाणी घाला, पण येथे लोकांच्या नाकातोंडात पाणी गेलेय, रोजगार बुडाला आहे, अशी कोपरखळी मारतानाच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी, मनपाच्या बस सेवेतून डिझेल बस जरा बाजूला काढा, काय आहे, सध्या डिझेल खूपच स्वस्त आहे, अशा शब्दांत शेरेबाजी केली आणि बस सेवा लोकार्पणाच्या कार्यक्रमात राजकीय सामनाच रंगला. महापालिकेत सत्ता भाजपची, परंतु राज्यात शिवसेना आणि महाविकास आघाडीची. त्यामुळे या सोहळ्याच्या प्रारंभिक नियोजनापासूनच राजकीय रंग भरत गेले. सत्तारूढ भाजपने सुरुवातीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रम करण्याचा घाट घातला असला तरी नंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांचे नाव अपरिहार्यच ठरले. त्यातच फडणवीस आणि भुजबळ हे एकाच व्यासपीठावर असल्याने उभय नेते कोणते राजकीय विधान करतात याकडे लक्ष लागून होते. फडणवीस यांनी आपल्या भाषणात राजकीय भाषण केले नाही. मात्र, भुजबळ यांच्या कोपरखळ्यांनी एकदमच रंगत आली. महापौर सतीश कुलकर्णी यांनी जलनेतीबाबत प्रचार करून त्याच्या स्वलिखित पुस्तकाचे प्रकाशनही याच सोहळ्यात केले. त्यावर बोलताना भुजबळ यांनी महापौर म्हणतात जलनेती करा, मात्र, येथे लोकांच्या नाकातोंडात पाणी गेले आहे, त्यामुळेे नाकातून पाणी काढणारी जलनेती काय करणार, असा प्रश्न करताच सभागृहात हशा पिकला. कोरोनामुळे लॉकडाऊन केल्याने लोकांचे रोजगार गेले, त्यामुळे तेही अडचणीत आणि व्यापार-उद्योग बंद असल्याने सरकारला कर मिळत नाही, त्यामुळे सरकारही अडचणीत अशी स्थिती झाल्याचे नमूद केले.
नाशिक महापालिकेच्या ताफ्यात पर्यावरणस्नेही सीएनजी बस आहेत, त्याचबराेबर पन्नास डिझेल बसदेखील आहेत, त्या डिझेल बस मात्र लवकर बाहेर काढा, एक तर त्या प्रदूषण करतात आणि दुसरे म्हणजे तुम्ही डिझेल इतके स्वस्त केलेय, असे भुजबळ यांनी सांगताच सभागृहात हास्यकल्लोळात बुडाले.
इन्फो...
आता महापौर थेट केंद्रीय मंत्र्यांना फोन करतील...
महापौर सतीश कुलकर्णी यांनी कोरोनाकाळात मुंबईवरून फोन करून वीस हजार रेमडेसिविर कसे आणले तसेच फडणवीस यांनी ऑक्सिजन टँकर कसे पाठवले याचे वर्णने केले होते. भुजबळ यांनी आपल्या भाषणात सुरुवातीलाच केंद्रीय मंत्रिमंडळात डॉ. भारती पवार यांची निवड झाल्याने महापौर आता थेट डॉ. पवार यांना फोन करून रेमडेसिविर मागवतील त्यामुळे तिसऱ्या लाटेला थेट मदत मिळू शकतील, असे सांगताच सभागृहात हशा पिकला.
इन्फो..
भुजबळ यांनी फडणवीस यांना पुष्पगुच्छा दिला अन्...
कार्यक्रमाच्या प्रारंभी अतिथींचा सत्कार सुरू झाला आणि निवेदिकेने महापालिका आयुक्त फडणवीस यांचा सत्कार करतील, असे सांगितले. ताेच एक महिला गुच्छही घेऊन आली. मात्र, आयुक्तांनी महापौरांना सत्कार करण्यास सांगितले. व्यासपीठावर ही खुणवाखुणवी सुरू असतानाच भुजबळ यांनीच पुष्पगुच्छ घेऊन तो फडणवीसांना देऊन टाकला. त्यामुळे सभागृहात खसखस पिकली.
इन्फो..
महापालिकेची बस सेवा सुरू केली पाहिजे, मात्र त्याचा एक अनुभव करताना नगरसेवकांनी मात्र आपल्या आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या घरापासूनच बस घ्या, असा आग्रह करता कामा नये, असे सांगितले. मुंबईत शिवसेनेचे नगरसेवक असताना आपणदेखील बस सुरू करण्यासाठी अशाच प्रकारे आपल्या घराजवळून न्या असे सांगायचो, असे मिश्कीलपणे सांगितले.