कृषिनगर रस्त्यावर ‘धुळवड’
By Admin | Updated: August 14, 2016 22:54 IST2016-08-14T22:54:10+5:302016-08-14T22:54:52+5:30
कचचा खच : वाहने घसरून अपघात; रस्त्यावर साचली माती

कृषिनगर रस्त्यावर ‘धुळवड’
नाशिक : सायकलसर्कलपासून ते जुने पोलीस आयुक्तालयापर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कच व माती साचल्याने वाहने घसरून अपघात होत आहे. वाहतुकीमुळे संपूर्ण रस्ता धुळीत हरवत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
पावसानंतर शहरातील सर्वच रस्त्यांभोवती माती आणि बारीक कचचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसत आहे. दुभाजकांभोवती साचलेली माती किंवा चौफुलीवर सखल भागात पसरलेल्या कचचा खच विविध रस्त्यांवर आढळून येत आहे. पावसाने आठवडाभरापासून विश्रांती घेतली असली तरी अद्याप शहरांमधील महत्त्वांच्या रस्त्यांची स्वच्छता महापालिकेने सुरू केलेली नाही. त्यामुळे नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत असून, रस्त्यांवरून मार्गस्थ होताना डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
कृषिनगर जॉगिंग ट्रॅकच्या प्रारंभीपासून तर थेट सायकलसर्कलपर्यंत रस्त्यावर कच पसरली असून, या रस्त्यावर मागील काही दिवसांपासून ‘धुळवड’ उडत आहे. दुचाकीस्वार व पादचाऱ्यांना या रस्त्यावरून मार्गस्थ होणे अवघड झाले आहे. चारचाकी वाहनांची वाहतूक आणि रस्त्यावर साचलेली कच यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरत आहे. रस्त्याने ये-जा करणाऱ्या दुचाकीचालक, पादचाऱ्यांसह जॉगिंग ट्रॅकवरून फेरफटका मारणाऱ्या नागरिकांनाही धुळीचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावरून जाताना वाहने घसरून अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे. (प्रतिनिधी)