धस कनेक्शन नाशिकपर्यंत एसीबी : जमीन प्रकरणात अधिकाऱ्यांचा शोध
By Admin | Updated: November 16, 2014 00:50 IST2014-11-16T00:50:05+5:302014-11-16T00:50:36+5:30
धस कनेक्शन नाशिकपर्यंत एसीबी : जमीन प्रकरणात अधिकाऱ्यांचा शोध

धस कनेक्शन नाशिकपर्यंत एसीबी : जमीन प्रकरणात अधिकाऱ्यांचा शोध
मुंबई : सत्तेवरून पायउतार झाल्यावरही जमिनींच्या काही प्रकरणात गडबड केल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या रडारवर माजी महसूल राज्यमंत्री सुरेश धस आलेले असतानाच, त्यांच्या शासकीय निवासस्थानात सापडलेल्या काही जमिनींच्या फाईलींच्या चौकशीत मात्र धस यांचे जमीन कनेक्शन नाशिकपर्यंत पोहोचल्याचे उघड झाले असून, त्यात काही शासकीय अधिकाऱ्यांभोवती संयशाचे ढग जमा होऊ लागले आहेत. सुरेश धस यांनी विधानसभा निवडणूक झाल्यानंतरही त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या जमीन महसुलाच्या अपील प्रकरणात निकाल दिल्याची बाब त्यांच्या कार्यालयातील सुराडकर या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतल्यानंतर उघडकीस आले. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धस यांच्या शासकीय निवासस्थानाची झडती घेतली असता, सप्टेंबर महिन्यात त्यांनी जमीन प्रकरणात निकाल दिलेले कागदपत्रे आढळून आली आहेत. या कागदपत्रांमध्ये नाशिक जिल्'ातील काही प्रकरणांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. त्यातील काही प्रकरणांमध्ये धस यांनी दिलेल्या निकालांविषयी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला संशय आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिन्नर व नाशिक तालुक्यातील काही प्रकरणांची सुनावणी धस यांच्याकडे होती, त्यात नाशिकच्याच काही अधिकाऱ्यांचा विशेष रस असावा असे कागदपत्रांवरून दिसून आले आहे. त्यातही कोणा शहा नामक बांधकाम व्यावसायिकाच्या जमीन प्रकरणात सुनावणीसाठी पाठविण्यात आलेल्या अधिकाऱ्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला अधिक संशय आहे.