धर्मध्वज शोभायात्रेने कुंभपर्वाचा शंखनाद
By Admin | Updated: July 13, 2015 23:09 IST2015-07-13T23:08:16+5:302015-07-13T23:09:43+5:30
.दुमदुमले नाशिक, त्र्यंबकेश्वर : विधिवत पूजनानंतर ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक; आज ध्वजारोहण

धर्मध्वज शोभायात्रेने कुंभपर्वाचा शंखनाद
नाशिक : ढोल-ताशांचा गजर, फडकणारे भगवे ध्वज, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, देवतांचा नामघोष अशा भारावलेल्या वातावरणात सुमारे पंचवीस चित्ररथांचा सहभाग असलेल्या धर्मध्वज शोभायात्रेने अवघे नाशिक शहर आज दुमदुमून गेले. गोदाघाटावरील रामकुंडावर उद्या (दि. १४) सकाळी सिंहस्थ कुंभमेळ्याचे धर्मध्वजारोहण होणार असून, त्या पार्श्वभूमीवर आज शहरातून काढण्यात आलेल्या या शोभायात्रेने कुंभपर्वाचा बिगुल वाजला.
पुरोहित संघाच्या वतीने कुंभमेळ्यासाठी १५ फूट लांब व साडेचार फूट रुंदीचा धर्मध्वज तयार केला असून, उद्या सकाळी ६.१६ वाजता ध्वजारोहण होणार आहे. या धर्मध्वजाची आज सायंकाळी संपूर्ण शहरातून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. श्री काळाराम मंदिरापासून या शोभायात्रेला प्रारंभ झाला. महंत ग्यानदास, विश्व हिंदू परिषदेचे महासचिव प्रवीण तोगडिया, श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख अण्णासाहेब मोरे, स्वामी डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज , खासदार हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विजयश्री चुंभळे, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मंदिराच्या आवारात रामनामजप झाल्यानंतर धर्मध्वज पालखीत ठेवून गाभाऱ्यात नेण्यात आला. तेथे वेदमंत्राच्या घोषात विधिवत पूजन झाल्यानंतर तो खास सजवलेल्या वाहनातील भव्य अमृतकुंभावर ठेवण्यात आला. नाग चौक, जुना आडगाव नाका, गणेशवाडी, दिल्ली दरवाजा, नेहरू चौक, धुमाळ पॉइंट, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्ड या मार्गे शोभयात्रा रामकुंडावर पोहोचली. तेथे गोदामातेची आरती केल्यानंतर शोभायात्रेचा समारोप झाला. धर्मध्वज पुरातन गोदावरीमाता मंदिरात ठेवण्यात आला.
शोभायात्रेत विविध धार्मिक संस्थांचे २५ चित्ररथ सहभागी झाले होते. त्यांनी केलेले देखावे लक्ष वेधून घेत होते. ढोल-ताशा, टाळ-मृदंग, बॅण्ड, लेझीम पथकाने परिसर दुमदुमून जात होता. पुरुषांबरोबर महिला-मुलींनीही सादर केलेले मर्दानी खेळ, थरारक कसरती भाविक मोबाइलमध्ये टिपून घेत होते. शोभायात्रेच्या स्वागतासाठी रहिवाशांनी रस्त्यावर रांगोळ्या रेखाटल्या होत्या. शोभायात्रेत तिन्ही आखाड्यांच्या संत-महंतांसह हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था, प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय, इस्कॉन, बारा बलुतेदार महासंघ, पेशवाई ग्रुप यांच्यासह विविध संस्था-संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.