‘शाही’ मिरवणुकीला भाविक मुकणार
By Admin | Updated: August 25, 2015 23:36 IST2015-08-25T23:35:26+5:302015-08-25T23:36:03+5:30
निर्बंध : पोलिसांच्या मनमानीमुळे सारेच हतबल

‘शाही’ मिरवणुकीला भाविक मुकणार
नाशिक : भाविकांची गर्दी, त्यातच सुरक्षतेचा प्रश्न याचा बाऊ करून पोलिसांनी जे निर्बंध केले आहेत, त्याचा फटका थेट साधू-महंतांनाही बसणार असून, अंगकांती सजवलेले आणि सुंगधित फुलांची आभूषणे परिधान करून रथावर आरूढ होऊन शाही मिरवणुकीत सहभागी झालेले महंत केवळ त्यांच्याजवळ असलेले अनुयायी आणि पोलीसच बघू शकतील. कारण भाविकांना मिरवणूक मार्गापासून कोसो दूर ठेवण्याचे नियोजन करून ठेवण्यात आले आहे.
दर बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा आणि त्यात होणारी पर्वणी ही जगभरातील भाविकांना आकर्षित करीत असतात. या आकर्षणापोटीच लाखो भाविक कुंभमेळा भरेल त्याठिकाणी येतात. आताही नाशिकला एका पर्वणीला किमान एक कोटी भाविक येतील असे नियोजन आहे.
पारंपरिक शस्त्रांचे खेळ आणि धर्मध्वजा घेऊन निघालेल्या या साधू-महंतांच्या अग्रणी इष्टदेवता म्हणजेच रामलल्लाच्या मूर्त्या असतात. या इष्ट देवतांचीच शाही मिरवणूक मानली जाते. ही मिरवणूक तपोवनातून पारंपरिक मार्गाने रामकुंडावर पोहोचते, तेव्हा स्नानासाठी उत्सुक साधू-महंतांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. त्यांच्या शाही मिरवणुकीला पाहून भाविक नतमस्तक होत असतात, परंतु पोलिसांच्या अति दक्षतेमुळे साधू-महंतांना त्यांच्या ‘शाही’ मिरवणुकीचे ‘वैभव’ भाविकांना दाखविता येणार नाही की भाविकांना नतमस्तक होता येणार नाही. त्यामुळे बारा वर्षांनी होणारा हा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणार आहे किंवा नाही हे दिसूच शकणार नाही.
नाशिकरोडच्या भाविकांनी दसक पंचकला स्नान करा, नाशिकच्या भाविकांना दुपारी दोन वाजेनंतर गोदापात्रात परवानगी अशा पोलिसांच्या निर्बंधांमुळे शाही मिरवणूक बघणे कोणालाही शक्य होणार नाही. त्यामुळे आखाड्यातील अनुयायी, निवडक हितचिंतक आणि बंदोबस्ताला असलेले पोलीस यांनाच हे भाग्य लाभणार आहे. (प्रतिनिधी)