आषाढी एकादशीनिमित्त रामकुंडात भाविकांचे स्नान
By Admin | Updated: July 16, 2016 00:13 IST2016-07-16T00:06:47+5:302016-07-16T00:13:40+5:30
टाळमृदुंगाचा गजर : शहरात विठूनामाचा जयघोष

आषाढी एकादशीनिमित्त रामकुंडात भाविकांचे स्नान
नाशिक : आषाढी एकादशीनिमित्त रामकुंडात हजारो भाविकांनी पवित्र स्नान केले. नाशिकच्या रामकुंड परिसरात सकाळपासूनच भाविकांनी गर्दी करीत टाळमृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठलनामाच्या जयघोषात भाविकांनी गोदावरीत डुबकी घेत चंद्रभागेतील स्नानाची अनुभूती घेतली. दरम्यान विठ्ठलमंदिरासह शहरातील इतर मंदिरांमध्येही विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
आषाढी एकादशीला पंढरीच्या वारीला जाता आले नाही, नाशिकला रामकुंडावर जाऊन वारी करायची म्हणून हजारो वैष्णवजन दिंडीचा आनंद घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने वारकरी गोदाकाठी जमले. मनातील विठ्ठलाची भक्ती आणि सावळ्या मूर्तीच्या दर्शनाच्या ओढीने भाविकांनी पंचवटीतील काळाराम मंदिर परिसरातील विठ्ठल मंदिर व रामकुंड परिसरातील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली. त्याचप्रमाणे जुनी तांबट गल्लीतील तुकाराम महाराज मंदिरातील विठ्ठलमूर्ती, सराफ बाजारातील विठ्ठल मंदिर, तसेच कॉलेजरोड परिसरातील विठ्ठल मंदिरातही भाविकांच्या लांबच लाब रांगा लागल्या होत्या. परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते.