कुंभमेळ्यासाठी पालिकेला वाढीव निधी ‘देवेंद्र’ पावले : लवकरच पंतप्रधानांना भेटणार
By Admin | Updated: November 9, 2014 00:03 IST2014-11-09T00:02:41+5:302014-11-09T00:03:26+5:30
कुंभमेळ्यासाठी पालिकेला वाढीव निधी ‘देवेंद्र’ पावले : लवकरच पंतप्रधानांना भेटणार

कुंभमेळ्यासाठी पालिकेला वाढीव निधी ‘देवेंद्र’ पावले : लवकरच पंतप्रधानांना भेटणार
नाशिक : कुंभमेळ्याच्या कामासाठी आर्थिक ओढाताण सहन करणाऱ्या महापालिकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलासा दिला आहे. अगोदरच्या सरकारने कबूल केलेला निधीच नव्हे, तर वाढीव निधी देण्याची तयारी फडणवीस यांनी केली आहे. त्यासाठी लवकरच शिखर समितीची बैठक बोलविण्यात येणार आहे. तसेच केंद्राकडून निधी मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितल्याने आता पालिकेला अच्छे दिन खुणावू लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना शुक्रवारी विनंती केली होती. त्यानुसार त्यांनी वेळ घेऊन देताच शनिवारी दुपारी मुंबई येथील स'ाद्री अतिथीगृहावर फडणवीस यांची भेट घेण्यात आली. छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरूमित बग्गा आणि स्थायी समिती सभापती राहुल ढिकले तसेच अन्य नगरसेवकांनी पालिकेची कैफियत मांडली आणि पालिका हद्दीत हा कुंभमेळा होत असला तरी त्याबाबत पायाभूत सुविधांसाठी निधीची गरज असल्याचे सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने त्यासंदर्भातील कामे वेळेत झाली पाहिजे यासाठी पालिकेला सत्वर निधी दिला पाहिजे अशी भूमिका व्यक्त केली. राज्यशासनाकडून अधिकाधिक निधी महापालिकेला दिला जाईल असे सांगताना त्यासंदर्भात कुंभमेळा शिखर समितीची बैठक लवकरच बोलविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. केंद्रशासनाकडून निधी मिळावा यासाठी आपण आणि छगन भुजबळ पंतप्रधानांची वेळ घेऊ आणि त्यांच्याकडे स्थानिक आमदार आणि पालिका पदाधिकाऱ्यांसमवेत भेट घेऊ असेही त्यांनी सांगितले.