विकासकामे मार्गी लावा,
By Admin | Updated: October 14, 2015 23:43 IST2015-10-14T23:42:22+5:302015-10-14T23:43:54+5:30
अध्यक्षांना भुजबळांच्या कानपिचक्याआठ सदस्यीय समितीची नेमणूक : सदस्यांनी वाचला तक्रारींचा पाढा

विकासकामे मार्गी लावा,
नाशिक : जिल्हा परिषदेतील सत्ताधारी गटातील सुदोपसुंदीचे नाट्य अखेर माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या दरबारात पोहोचले. त्यानंतर आमदार भुजबळांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांनी वर्षभरावर जिल्हा परिषदेच्या निवडणुका येऊन ठेपल्याने विकासकामे तत्काळ मार्गी लावावीत, अशा शब्दात जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांना कानपिचक्या दिल्याचे समजते.
येथील राष्ट्रवादी भवनात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होेते. सुरुवातीला आमदार छगन भुजबळ यांनी जिल्हा परिषदेच्या महिला सदस्यांसह व पुरुष सदस्यांच्या एकेक करून तक्रारी ऐकून घेतल्या. तक्रारींचा सूर अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्याकडून विकासकामांच्या फाईलींची अडवणूक करण्यात येत असल्याचे समजते. तर काही सदस्यांनी आमची कामे होतात. मात्र त्याला थोडा विलंब होतो, यासह विविध बाबी आमदार भुजबळ यांच्या निदर्शनास आणून दिल्या. नंतर वेळेची मर्यादा पाहता उपस्थित सर्व पदाधिकारी व सदस्यांना आमदार छगन भुजबळ यांनी मार्गदर्शन केले. त्यात वर्षभरावर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. जिल्हा परिषदेत सत्तेत असल्याने जनतेची जास्तीत जास्त कामे करावीत, कोणत्याही कामांना विलंब होता कामा नये, अशा सूचना दिल्याचे समजते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे व उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनीही कामकाजाबाबत आढावा सादर केल्याचे समजते. प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, महिला जिल्हाध्यक्ष शोभा मगर, जिल्हा परिषद गटनेते रवींद्र देवरे, अलका साळंखे, नितीन पवार, विलास माळी, गोरख बोडके, संगीता ढगे, अर्जुन मेंगाळ, अर्जुन बर्डे, शैलेश सूर्यवंशी, जयश्री पवार, बाळासाहेब गुंड, प्रा. प्रवीण गायकवाड, सिंधूताई सोनवणे, यतिन पगार आदि उपस्थित होते (प्रतिनिधी)