तत्काळ परिणाम दाखविणारा विकास हवा
By Admin | Updated: May 3, 2015 02:02 IST2015-05-03T01:57:33+5:302015-05-03T02:02:39+5:30
तत्काळ परिणाम दाखविणारा विकास हवा

तत्काळ परिणाम दाखविणारा विकास हवा
नाशिक : केवळ विकासाची संकल्पना लोकांसमोर ठेवून पूर्ण बहुमताने सत्तेत आलेल्या मोदी सरकारला वर्ष पूर्ण झाले. मात्र, तंत्रज्ञानाच्या युगात लोकांना पाच वर्षांनंतरचा विकास अपेक्षित नसून, तत्काळ परिणाम दाखविणारा विकास हवा असल्याने त्यांचे विकासाचे कार्ड समाधानकारक नसल्याची भावना लोकांमध्ये रूढ होत आहे. अपेक्षांचे ओझे असलेल्या मोदी सरकारसमोर हे आव्हान असल्याचे अर्थतज्ज्ञ अनिल बोकील यांनी सांगितले. गंगाघाट येथील देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगण येथे आयोजित वसंत व्याख्यानमालेत पृथ्वीराजशेठ निमाणी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘मोदी सरकार आणि अर्थक्रांती’ या विषयावर ते बोलत होते. बोकील म्हणाले की, मोदी सरकारच्या काळात स्वच्छ भारत, जनधन योजना, मेकिंग इंडिया, स्मार्ट सिटी या चार महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा केली गेली. त्याचबरोबर वस्तू सेवा आणि कर व भूमी अधिग्रहण कायदा ही दोन विधेयके मांडण्यात आली. मात्र, राज्यसभेत पूर्ण बहुमत नसल्याने त्यांना विरोधकांचा प्रखर सामना करावा लागत आहे. ही दोन्ही विधेयके मान्य झाल्यास त्याचा तत्काळ सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम दिसेल. मात्र, या विधेयकामागे राजकारण आहे की विकासाची संकल्पना हेही जनतेसमोर स्पष्ट करायला हवे. मुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारात २०१९ मध्ये माझे प्रगतिपत्र लोकांसमोर ठेवले जाणार असल्याचे जाहीर केले होते. त्यादृष्टीने ते प्रयत्नही करीत आहेत. मात्र, अर्थक्रांती घडवून आणण्यासाठी विरोधकांना बाजूला सारून विकासाच्या संकल्पना लोकांपर्यंत तत्काळ पोहचावाव्याच लागतील, असेही बोकील यांनी यावेळी सांगितले. यावेळी व्यासपीठावर सुभाष पारख, मिलिंद कुलकर्णी, संजय परांजपे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत बेणी यांनी केले. (प्रतिनिधी)