त्र्यंबकेश्वरची विकासकामे मार्गी लावा
By Admin | Updated: July 2, 2017 00:02 IST2017-07-02T00:01:52+5:302017-07-02T00:02:07+5:30
साकडे : आदिवासी कल्याण समितीला निवेदन

त्र्यंबकेश्वरची विकासकामे मार्गी लावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंगणवाड्या, प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे तसेच ग्रामपंचायतींची बांधकामे मार्गी लावावीत यांसह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा दौऱ्यावर आलेल्या आदिवासी कल्याण समितीला जिल्हा परिषद सदस्य रूपांजली माळेकर यांनी दिले.
निवेदनात म्हटले आहे की, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बहुतांश अंगणवाड्या गळक्या व नादुरुस्त आहेत. त्यांची तातडीने दुरुस्ती व्हावी तसेच या अंगणवाड्यांना डिजिटल करण्यात यावेत. तसेच तालुक्यातील बहुतांश प्राथमिक शाळा नादुरुस्त असून, त्यांची दुरुस्ती व्हावी. तसेच शाळांना पाण्याची व्यवस्था करून संरक्षक भिंत, स्वच्छतागृह तसेच सर्व शाळा ई-लर्निंग करण्यात याव्यात. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांची अवस्था गळकी असून, त्यांची तत्काळ दुरुस्ती व्हावी, अन्यथा पावसात रुग्णांना उपचार घेण्याची वेळ येईल. तालुक्यातील अनेक पाणीपुरवठा योजना विहिरी कोरड्या पडल्याने बंद झालेल्या आहेत. त्यासाठी तातडीने आवश्यक ती उपाययोजना करावी, तसेच ग्रामपंचायत इमारतीसह मूलभूत सुविधांची कामेही तत्काळ करण्यात यावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.