अल्पवयीन मुलीचे अपहरण ठरले देवदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:20 IST2021-02-17T04:20:35+5:302021-02-17T04:20:35+5:30
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जयभवानीरोड येथुन सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास एका शाळकरी मुलीला रिक्षातून आलेल्या दोन महिलांनी ...

अल्पवयीन मुलीचे अपहरण ठरले देवदर्शन
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जयभवानीरोड येथुन सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास एका शाळकरी मुलीला रिक्षातून आलेल्या दोन महिलांनी पळवून नेल्याचा फोन उपनगर पोलीस ठाण्यात खणखणला. जिल्हा रुग्णालयातून दीड वर्षाच्या चिमुकलीला उचलून नेण्याची घटना ताजी असल्याने या फोनमुळे उपनगर पोलिसांची भंबेरी उडाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, मनवीरसिंग परदेशी आदींनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळावरील सीटीव्ही फुटेज तपासले. माहिती व फोटो घेऊन पोलिस पथके ठक्कर बाजार, रेल्वे स्थानक, इतर प्रमुख बस स्थानके, शालिमार, मंदिरे व गर्दीच्या ठिकाणी रवाना झाली. उपनिरीक्षक विकास लोंढे, हवालदार विजय पांडव यांनी विहितगाव वालदेवी किनारालगत असलेल्या एका धार्मिक स्थळाभोवती येथे शोध घेतला असता दोन महिलांसमवेत अल्पवयीन मुलगी दिसून आली. पोलिसांनी लागलीच दोन्ही महिलांना ताब्यात घेत त्यांच्या तावडीतून सुटका केली. घराच्या परिसरात राहणा-या ओळखीच्या महिलांसोबत गणेश जयंती निमित्त अण्णा गणपती मंदिर येथे ती दर्शनासाठी गेली होती. गणेश जयंती निमित्त ओळखीच्या महिलांसोबत दर्शनासाठी ती गेल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. उपनगर पोलिसांनी अवघ्या तीन तासात बेपत्ता मुलीचा शोध लावला.