चोरी गेलेल्या जीपचा लागला शोध
By Admin | Updated: January 31, 2016 22:40 IST2016-01-31T22:37:45+5:302016-01-31T22:40:24+5:30
चोरी गेलेल्या जीपचा लागला शोध

चोरी गेलेल्या जीपचा लागला शोध
वणी : दोन दिवसांपूर्वी चोरी झालेल्या पिकअप जीपचा शोध जागरूक इसमामुळे लागला असून, गुजरात राज्याच्या हद्दीत बेवारस स्थितीत रस्त्याच्याकडेला सदर पिकअप आढळून आल्याने जीपमालकाचा जीव भांड्यात पडला आहे. जगदंबादेवी मंदिर परिसरातील ब्राह्मण गल्लीत केटरिंगचा व्यवसाय करणारे लादुराम जोशी यांच्या मालकीची पिकअप (क्र. एमएच ४/डीएक्स ३५९१) २९ जानेवारी रोजी घरालगत लावली. रात्रीच्या सुमारास बेमालूमपणे अज्ञात चोरट्यांनी जीप लांबविल्याचे जोशी यांच्या लक्षात आले. पोलिसांकडे याबाबत तक्र ार करण्यात आली. सदर जीप वणी-सापुतारा रस्त्यावरील माळेदुमाला परिसरातील पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी थांबली; मात्र या ठिकाणी डिझेल न मिळाल्याने ही जीप सुसाट वेगाने तेथून निघून गेली. या ठिकाणी असणाऱ्या चंद्रकांत काकड यांनी ही जीप ओळखली व शंकेची पाल चुकचुकल्याने त्यांनी ३० तारखेला सकाळी जोशी यांची भेट घेऊन याबाबत माहिती दिली. वणी-सापुतारा रस्ता मित्रांसमवेत जोशी यांनी पिंजून काढला असता गुजरात राज्याच्या प्रवेश सीमेजवळील सीसीटीव्ही फुटेज तेथील अधिकारी यांच्या मदतीने तपासले असता ही जीप गुजरात राज्यात गेल्याचे आढळून आले.
या जीपचा माग काढला असता सापुतारा या पर्यटनस्थळापासून रस्त्याच्या कडेला ही जीप आढळून आली. डिझेल संपलेल्या स्थितीत ही जीप होती. पोलिसांना ही माहिती देण्यात आली. दरम्यान काही कालावधीपूर्वी संतोष साखला यांचीही पिकअप अशाच पद्धतीने चोरी गेली होती. (वार्ताहर)