कांदा भावात सुधारणा असली तरी निर्यात कमीचा फटका भाववाढीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:16 IST2021-09-21T04:16:24+5:302021-09-21T04:16:24+5:30
लासलगाव : कांदा निर्यातीचे धरसोडीचे धोरणाचा फटका आता भारतीय कांदा बाजारपेठेला जाणवु लागला आहे. देशातील महत्त्वाच्या कांदा ...

कांदा भावात सुधारणा असली तरी निर्यात कमीचा फटका भाववाढीला
लासलगाव : कांदा निर्यातीचे धरसोडीचे धोरणाचा फटका आता भारतीय कांदा बाजारपेठेला जाणवु लागला आहे. देशातील महत्त्वाच्या कांदा मागणी असलेल्या शहरांची मागील पंधरवड्याला कमी असलेली मागणी या सप्ताहात वाढल्याने कांदा भावात शंभर ते सव्वाशे रुपयांची तेजी आली असली तरी भावात वाढ नसल्याने कांदा उत्पादकांच्या गोटात भाववाढीची प्रतीक्षा आहे.
गत सप्ताहात लासलगाव मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची ५१.५८८ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रुपये ५०० कमाल रुपये १,६७० तर सर्वसाधारण रुपये १,४६८ प्रती क्विंटल राहिले.
कांदा हे नगदी पीक आहे. व सर्व अर्थकारणाची गणिते कांदा उत्पादकांच्या दृष्टीने मालाचे उत्पादन, साठवणूक व बाजारपेठेत मिळणारा बाजारभाव यावरच अवलंबून आहे.
भारतीय कांदा निर्यातीने जोर धरलेला नाही. कारण भारतापेक्षा कमी दरात पाकिस्तान, चीन, अफगाणिस्तान आणि तुर्कस्थानाचा कांदा पोहचत आहे. कमी दरात आणि कमी वेळेत वाहतूक खर्चात हा कांदा परदेशी मिळत आहे.
त्यामुळे भारतीय कांदा निर्यात कमी होत आहे. याकरिता निर्यातक्षम धोरणात प्रोत्साहनाचा निर्णय झाला तर कांदा निर्यातीत वाढ होईल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
कांदा महाराष्ट्रात मुबलक आहे. कांदा उत्पादकांना भाववाढीची अपेक्षा आहे. त्यामुळे साठवणूक केलेला कांदा बाजारपेठेत आलेला नाही. तरीही कांदा भाववाढण्याची शक्यता मोठी जमेची बाजू असणार आहे.
कांदा पिकांसाठी सध्या महाराष्ट्राला मध्य प्रदेशमधील कांदा पिकाशी स्पर्धा करावी लागत आहे. कांदा बाजारपेठेत सध्या हा कांदा काही ठिकाणी वाढलेल्या मालवाहतूक भावाने स्वस्त दरात उपलब्ध होत आहे. आता कांदा भावात वाढ होणार की भावाची पातळी अशीच राहणार हे सर्व गणित आगामी पाऊस आणि वातावरणात कोणत्या राज्यातील कांदा अपेक्षेप्रमाणे येतो की कांदा उत्पादन कमी तेथील बाजारपेठेत येते यावरच आता भाव वाढीच्या आशा पल्लवित होतील.
सध्या सप्टेंबर सुरू असला तरीही कांदा भाव चढ-उतारीची शक्यता डिसेब॔र ते फेब्रुवारी या महिन्यात दिसणार आहे. कांदा उत्पादकांच्या चाळीतले कांदा आर्द्रतेमुळे खराब होत आहे. वजनात तसेच आकारमानातही कमी होत आहे. त्यामुळे कांदा वरचेवर काढून तो खराब कांदा चाळीत. निवडून तो खराब होणार नाही अशा पध्दतीने साठवून ठेवण्यातच कांदा उत्पादकांत हालचाल आहे.
चौकट...
‘लासलगाव प्याज’ हे विशेष टपाल पाकीट प्रकाशित
कांदा आणि लासलगाव शहर यांचे वेगळेच नाते आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगावचा कांदा हा जगात प्रसिद्ध आहे आणि या कांद्यामुळे नाशिक जिल्ह्यतील लासलगाव शहराला आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झाली आहे. कांद्याला नुकतेच जी आय मानांकन प्राप्त झाले आहे. अशा या लासलगावच्या जगप्रसिद्ध कांद्याला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी टपाल विभागाच्या वतीने ‘लासलगाव प्याज’ या विशेष टपाल पाकिटाचे अनावरण लासलगाव पोस्ट विभागाच्या कार्यालयात करण्यात आले.
नाशिक जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या कांद्याला अजून आंतरराष्ट्रीय स्थळावर ऐतिहासिक व पारंपरिक मूल्य प्राप्त व्हावे,तसेच जागतिक स्तरावर हा कांदा पोहोचावा यासाठी तसेच हा वारसा जतन करण्यासाठी भारतीय टपाल विभागाने पुढाकार घेत ‘लासलगाव प्याज’ हे विशेष टपाल पाकीट काढले आहे.