अटी-शर्ती शिथिल करूनही विरोध कायम
By Admin | Updated: February 17, 2016 23:41 IST2016-02-17T23:39:45+5:302016-02-17T23:41:45+5:30
उद्यान देखभाल ठेका : स्थानिक बचतगटांना काम देण्याचा आग्रह

अटी-शर्ती शिथिल करूनही विरोध कायम
नाशिक : शहरातील २८६ उद्यानांच्या देखभालीसाठी बचतगटांना देण्यात येणाऱ्या ठेक्यासंबंधी निविदेतील काही अटी-शर्ती शिथिल करूनही सदस्यांनी त्यास विरोध कायम ठेवत त्या-त्या भागातील स्थानिक बचतगटांनाच
देखभालीचे काम देण्याचा आग्रह धरला आहे. मंगळवारी झालेल्या महासभेत प्रशासनाने ठेवलेल्या प्रस्तावावर कोणताही निर्णय होऊ शकला नाही.
शहरातील उद्यानांच्या देखभालीसंबंधीचा विषय गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित आहे. महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी २८६ उद्यानांचा एकत्रित ठेका तीन वर्षांसाठी देण्याचा प्रस्ताव महासभेवर ठेवला होता. परंतु, महासभेने सदर ठेका बचतगटांसाठी देण्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर, प्रशासनाने बचतगटांसाठी ठेका देण्यासाठी निविदाप्रक्रिया राबविली; परंतु त्यातील खासगी मक्तेदाराला डोळ्यासमोर ठेवून केलेल्या अटी-शर्तींमध्ये काहीही बदल केलेला नव्हता. त्यामुळे २८६ उद्यानांपैकी १९२ उद्यानांच्या देखभालीसाठी एकही निविदा प्राप्त झाली नाही. ४४ उद्यानांना प्रत्येकी एक आणि १३ उद्यानांना प्रत्येकी २ निविदा प्राप्त झाल्या. ३७ उद्यानांनाच ३ किंवा ३ पेक्षा अधिक निविदा प्राप्त होऊ शकल्या. ८७.०६ टक्के उद्यानांच्या बाबतीत किमान आवश्यक निविदा प्राप्त होऊ शकल्या नाहीत.