मालेगाव येथे बंदी असूनही सर्रास गुटखाविक्री
By Admin | Updated: July 25, 2014 00:37 IST2014-07-24T22:31:13+5:302014-07-25T00:37:16+5:30
काणाडोळा : अन्न-औषध विभागावर नागरिकांचा आरोप

मालेगाव येथे बंदी असूनही सर्रास गुटखाविक्री
मालेगाव : राज्य शासनाने राज्यात गुटखाबंदी केलेली असूनही शहरात मोठ्या प्रमाणावर गुटखा साठवून ठेवण्यात आला आहे. परिसरातील चार ते पाच जिल्ह्यांत मालेगाव परिसरातून गुटखा वितरित केला जात असल्याचे पकडलेल्या काही घटनांनी उघड झाले. परिसरात सर्रास गुटख्याची विक्री सुरूअसून, संबंधित विभागाचे अधिकारी कोणतीही कारवाई करत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
देशात दरवर्षी गुटखा किंवा तंबाखू सेवनाने हजारो तरुणांचा बळी जातो. अनेकांना कर्करोगासारख्या असाध्य आजारांना तोंड द्यावे लागत आहे. यात तरुणपिढीचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आढळून आला आहे. या तंबाखू व गुटखा सेवनामुळे संपूर्ण तरुणपिढी बरबाद होत आहे. त्यामुळे तरुणपिढीला या घातक व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी व असाध्य आजारांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने २०११ पासून बंदी आणली आहे. त्यापूर्वी २००५ साली गुटखाबंदी झाली होती. मात्र तांत्रिक कारणास्तव मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे बंदीला २०११ साल उजाडले.
राज्यात संपूर्ण गुटखा उत्पादन, विक्री तसेच वाहतुकीवर बंदी असून, त्यावर कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनाला आहे. मात्र संबंधित विभाग त्यावर कारवाई करत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. राज्यात झालेल्या या गुटखाबंदीमुळे अनेकांचे भले झाले. गुटखाबंदी न होता त्याचे भाव दुप्पट-तिपटीने वाढले. बंदीमुळे गुटख्याची काळ्याबाजारात विक्री होत आहे. ही विक्री शहरातून करण्यात येत असल्याची चर्चा असून, ती खरी असल्याचे मागील काही दिवसांत उघड झाले आहे.
पोलिसांनी मागील तीन महिन्यांत पकडलेल्या गुटख्यापैकी अनेक ठिकाणी मालेगाव शहरातील वाहने किंवा आरोपी सापडल्याने शहरातून सर्वत्र गुटखा वितरित होत असल्याच्या माहितीला पुष्टी मिळते. यात मे महिन्यात पिंपळनेर पोलिसांनी गुटखा भरलेले तीन ट्रक पकडले होते. ते तीनही ट्रक शहरातील होते. यात अटक करण्यात आलेले संशयितही शहरातील होते. बागलाण, दिंडोरी, साक्री आदि ठिकाणीही पकडण्यात आलेल्या गुटख्यात शहराचा संबंध असल्याची माहिती आहे. तसेच शहर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी गुटखा वाहतूक करताना पकडलेले वाहन सटाणा येथील असल्याचे उघड झाले. ते शहरातील आयशानगर भागातून नेहमी गुटखा घेऊन जात होते. तसेच शहरात खुलेआम गुटख्याची खरेदी विक्री केली जात असतानाही अन्न व औषध विभागाला गुटख्याचे साठे सापडत नसल्याने नागरिकांना आश्चर्य वाटते. संबंधित विभागाने गुटखाबंदी नंतर शहरात सुमारे दोन ते तीन वर्षांपूर्वी शहर पोलीस ठाणेहद्दीत गुटखा जप्तीची केलेली कारवाई वगळता परिसरात गुटखा पकडल्याचे ऐकण्यात नाही. यामुळे संबंधित विभागावरच नागरिक संशय व्यक्त करीत आहेत.