उपसचिव साबळे आज चौकशीसाठी हजर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:12 IST2021-06-01T04:12:11+5:302021-06-01T04:12:11+5:30

राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) मागील दोन वर्षांपासून कोट्यवधींचा भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय ...

Deputy Secretary Sable will appear for questioning today | उपसचिव साबळे आज चौकशीसाठी हजर होणार

उपसचिव साबळे आज चौकशीसाठी हजर होणार

राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) मागील दोन वर्षांपासून कोट्यवधींचा भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेेत चौकशीचे आदेश दिले आहेत. गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड हे या चौकशीचे प्रमुख असून, गुरुवारपासून (दि. २७) आरटीओमधील विविध अधिकाऱ्यांपासून खासगी व्यक्तींचीही चौकशी केली जात आहे. सोमवारी (दि. ३१) तक्रारदार पाटील यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. सकाळी ११ वाजता ते पहिल्यांदाच पोलीस आयुक्तालयात आले. आतापर्यंत केवळ ई-मेलद्वारे ते संवाद साधत होते आणि प्रकृती बरी नसल्याच्या कारणावरून प्रत्यक्षपणे चौकशीला सामोरे जात नव्हते. दिवसभर आयुक्तालयाच्या वास्तूमधील गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशी सुरू होती. यामुळे आयुक्तालयात पोलिसांव्यतिरिक्त अन्य कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता.

--इन्फो--

चौकशीच्या पहिल्या दिवशी काही पुरावे केले सुपूर्द

पाटील यांच्या चौकशीमधून काही बाबी समोर आल्या असून, त्यांनी केलेल्या आरोपांशी संबंधित काही पुरावेही पोलिसांकडे सोमवारी दिले आहेत. संध्याकाळी पाच वाजता त्यांना पुन्हा प्रकृतीचा त्रास होऊ लागल्याने चौकशी थांबविण्यात आली. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता पुन्हा पाटील यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. ते आज, मंगळवारी अजून काही पुरावे आणि महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांकडे दाखल करण्याची शक्यता आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत आयुक्तालयात पोलिसांव्यतिरिक्त अन्य कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. तसेच बंदोबस्तही वाढविण्यात आला होता.

--इन्फो---

साबळे यांच्याविरुद्ध २५ कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

परिवहन मंत्री अनिल परब आणि परिवहन मंत्रालयातील उपसचिव प्रकाश साबळे, अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांचे घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप पाटील यांनी तक्रारीत केला आहे. वर्ध्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे परब यांच्या अत्यंत जवळचे आहेत, असेही तक्रारीत म्हटले आहे. यामुळेच मागील सहा वर्षांपासून साबळे हे परिवहन विभागाच्या उपसचिव पदावर टिकून आहेत. त्यांची बदली अन्य कुठल्याही मंत्रालयाच्या खात्यात केली गेली नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यांनी आतापर्यंत सुमारे २५ कोटी रुपये गिळंकृत केल्याचे पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Deputy Secretary Sable will appear for questioning today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.