नैराश्य, विवंचना अन् ताणतणाव आत्महत्यांचे मुख्य कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:51 AM2019-09-10T00:51:55+5:302019-09-10T00:52:44+5:30

चिंता, ताणतणाव, नैराश्य, मानसिक आजार, उद्याची विवंचना, कौटुंबिक समस्या, तत्कालीन कारणे अशा अनेक बाबी आत्महत्यांच्या वाढत्या प्रमाणास कारणीभूत ठरत आहेत. मानसिक आरोग्याशी संबंधित असलेल्या या गोष्टी आत्महत्येस कारणीभूत ठरत असल्यानेच जगभरात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे.

 Depression, anxiety and stress are the leading causes of suicides | नैराश्य, विवंचना अन् ताणतणाव आत्महत्यांचे मुख्य कारण

नैराश्य, विवंचना अन् ताणतणाव आत्महत्यांचे मुख्य कारण

googlenewsNext

आत्महत्या प्रतिबंध दिन
नाशिक : चिंता, ताणतणाव, नैराश्य, मानसिक आजार, उद्याची विवंचना, कौटुंबिक समस्या, तत्कालीन कारणे अशा अनेक बाबी आत्महत्यांच्या वाढत्या प्रमाणास कारणीभूत ठरत आहेत. मानसिक आरोग्याशी संबंधित असलेल्या या गोष्टी आत्महत्येस कारणीभूत ठरत असल्यानेच जगभरात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी समाजाला सकारात्मक बनवण्यासह आत्महत्येसंदर्भात जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत नाशिकच्या मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
जगभरात १० आॅगस्ट हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून पाळला जातो. त्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेकडूनदेखील सर्व देशांमध्ये विशेष उपक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, आत्महत्या कमी करण्यासाठी एकूणच समाजात सकारात्मकतेत वृध्दी, एकमेकांबाबत स्नेहभावना आणि दुसऱ्या व्यक्तीचा सहृदयतेने विचार करण्याची मानसिकता वाढविण्याची आवश्यकता असल्याचा तज्ज्ञांचा सूर आहे. आत्महत्यांचे प्रमाण कमी करणे आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी जनजागृती करणे ही काळाची गरज असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. प्रत्येक आत्महत्येला कारणीभूत असलेल्या गोष्टींचा अभ्यास होणे आवश्यक आहे. योग्य उपचार मिळाल्यास आत्महत्येच्या मानसिकतेतून संबंधिताला बाहेर काढता येते, असा सूरदेखील या क्षेत्राशी निगडित मान्यवरांनी व्यक्त केला.
नैराश्य, स्क्रीझोफ्रेनिया, ताणतणाव आणि मानसिक आजार हीच आत्महत्यांची प्रमुख कारणे असतात. तसेच समाजातील मानसिक सहनशीलतेचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. नकार सहन करणे, पचवण्याची क्षमताच लुप्त होत आहे. तसेच कोणत्याही व्यसनांच्या आहारी गेलेला व्यक्तींच्या आत्महत्येचे प्रमाणदेखील मोठे आहे.
- डॉ. हेमंत सोननीस, मानसोपचार तज्ज्ञ
तरुणांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण खूप वाढले असून नैराश्य, मानसिक आजार अशी कारणेच त्याला अधिक प्रमाणात कारणीभूत आहेत. कौटुंबिक संबंध, नातेसंबंध, प्रेमप्रकरणे, करिअर यामधील ताणतणाव आत्महत्यांच्या वाढत्या प्रमाणास कारणीभूत आहेत. नाशिकमध्ये हे प्रमाण गत दीड-दोन दशकात मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
- डॉ. जयंत ढाके, मानसोपचार तज्ज्ञ
आत्महत्या रोखण्यासाठी आणि त्याबाबत जनजागृती करण्यासाठी देश, समाज आणि व्यक्तिगत पातळीवर कृती करणे आवश्यक आहे. आत्महत्या ही एक सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. कुटुंब आणि समाजावर ती एक भावनिक आघात करते. मानसिक आजार, नैराश्य आणि तत्कालीक कारणे आत्महत्येला सर्वाधिक कारणीभूत ठरतात.
- डॉ. उमेश नागापूरकर, मानसोपचार तज्ज्ञ
आत्महत्यांचे धक्कादायक वास्तव आकड्यात
जगात दर ४० सेकंदाला एक आत्महत्या.
मृत्यूच्या २० अव्वल कारणांमध्ये आत्महत्या प्रकाराचा समावेश.
दरवर्षी जगात ८ लाख लोक आत्महत्या करून जीव गमावतात.
१५ ते २९ या वयोगटातील मृत्यूमध्ये दुसºया क्रमांकाचे कारण आत्महत्या असते.
एकूण आत्महत्यांपैकी ७९ टक्के प्रगतिशील देशांमध्येच होतात.
भारतात दर एक लाख व्यक्तींच्या मृत्यूपैकी २३ मृत्यू आत्महत्येमुळे होतात.

Web Title:  Depression, anxiety and stress are the leading causes of suicides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक