आचारसंहितेमुळे अडकल्या लाखोंच्या अनामत रकमा
By Admin | Updated: January 11, 2017 01:13 IST2017-01-11T01:13:13+5:302017-01-11T01:13:27+5:30
आचारसंहितेमुळे अडकल्या लाखोंच्या अनामत रकमा

आचारसंहितेमुळे अडकल्या लाखोंच्या अनामत रकमा
नाशिक : जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत जलयुक्त शिवार अभियान व २७०२ लेखाशीर्ष अंतर्गत मागविण्यात आलेल्या दोनशेहून अधिक निविदांपैकी अवघ्या ४९ निविदा उघडण्याला मुहूर्त लागला आहे. त्यामुळे उर्वरित निविदा उघडण्यात न आल्याने या निविदांपोटी भरण्यात आलेली एक टक्का अनामत रकमेपोटी लाखो रुपयांची रक्कम जिल्हा परिषदेकडे अडकून पडल्याने सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांवर उपासमारीची वेळ आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, केवळ सुशिक्षित बेरोजगार अभियंतेच नव्हे तर मजूर सहकारी संस्थांचेही लाखो रुपये अडकल्याचा आरोप काही मजूर सहकारी संस्थाचालकांनी केला आहे. जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे पश्चिम विभागामार्फत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुमारे २० कोटींच्या १३० कामांसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. या निविदा वृत्तपत्रात जाहिरात न दिल्याचे कारण देत प्रशासनाने रद्द करून नव्याने फेरनिविदा मागविल्या होत्या. जलयुक्तच्या १३० कामांपैकी अवघ्या ४९ कामांच्या निविदा उघडून कार्यारंभ आदेश देण्यात आले. उर्वरित ७९ निविदा उघडण्यातच न आल्याने सुशिक्षित बेरोजगारांची अनामत रक्कम अडकली आहे. आचारसंहिता काळात कार्यारंभ आदेश देता येत नाहीत. मात्र निविदा उघडण्याची तसेच न्यूनतम दर असलेली निविदा अंतिम करता येते. राहिलेल्या निविदा उघडण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)