संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
By Admin | Updated: June 13, 2014 00:21 IST2014-06-12T22:14:33+5:302014-06-13T00:21:39+5:30
संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचा पायी दिंडी सोहळा सुरू झाला. सुमारे १५ हजार वारकरी दिंडीत सामील झाले आहे.

संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
त्र्यंबकेश्वर : वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचा पायी दिंडी सोहळा सुरू झाला. सुमारे १५ हजार वारकरी दिंडीत सामील झाले आहे. कुशावर्त तीर्थावर यशोदाबाई अडसरे व त्यांचे पती सुशील अडसरे यांनी पूजा केल्यानंतर पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले.
तत्पूर्वी संत निवृत्तिनाथांच्या संजीवन समाधी मंदिरातून डोक्यावर पादुका घेऊन समाधी संस्थानचे अध्यक्ष मुरलीधर पाटील, संस्थेचे विश्वस्त दिंडीचे मानकरी मनू महाराज बेलापूरकर, बाळकृष्ण महाराज डावरे, भानुदास गोसावी, सुरेश गोसावी, जयंत महाराज गोसावी, देहू संस्थानचे बाळासाहेब देहूकर, रामकृष्ण महाराज लहवितकर, सुमनताई खुळे, अॅड. विलास आंधळे, चक्रांकित महाराज आळंदीकर, राठी महाराज, कसूरचे छगन महाराज जाधव आदि उपस्थित होते.
तीर्थराज कुशावर्तावर नगराध्यक्षांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर सर्वांचे स्वागत सत्कार, पाद्यपूजा व मान्यवरांचा सत्कार आदि कार्यक्रम झाले. पालखी बरोबरचे वारकरी टाळ- मृदंगाच्या तालावर तल्लीन होऊन त्र्यंबकेश्वर मंदिरापर्यंत आले.
देवस्थान ट्रस्टतर्फे मानकरी मान्यवरांचा सत्कार करण्यात आल्यानंतर पालखीने प्रस्थान केले. आज वटसावित्री पौर्णिमा असल्याने पूजेसाठी सुवासिनींची लगबग
चालू होती. त्र्यंबकेश्वर ही भगवान शिवाची नगरी, सुवासिनींनी अखंड सौभाग्यासाठी वडाच्या झाडाची
पूजा केली. वड या वृक्षासदेखील भगवान शिवाचा अवतार
मानण्याची श्रद्धा आहे. एकीकडे भाविक दिंडीने निघाले होते, तर दुसरीकडे महिलांची वटसावित्रीची पूजा सुरू होती. (वार्ताहर)