नाशिक : नाशिक विभागातील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना बदललेल्या कायद्याचे प्रशिक्षण देण्याबरोबरच विविध प्रकारच्या कार्यशाळा घेण्यासाठी निवासी स्वरूपाची विभागीय महसूल प्रबोधिनी नाशकात उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, त्यासाठी ८० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या प्रबोधिनीसाठी नाशिक तालुक्यातील मुंगसरे येथे जागा ताब्यात घेण्यात आली, तथापि दळणवळणाच्या साधनांचा विचार करता, मेरीच्या ताब्यातील जागा घेण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.महसूल अधिकारी व कर्मचा-यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात महसूल प्रबोधिनी असून, या प्रबोधिनीत महसूल अधिकारी, कर्मचा-यांना निवासी स्वरूपाचे प्रशिक्षण तसेच कार्यशाळांची सोय करण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रबोधिनीसाठी अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिका-यांची नियंत्रक म्हणून नेमणूक केली जाते व महसूल विषयक कायद्यांमधील बदल, नवीन योजना व धोरणांच्या अंमलबजावणीबाबतची माहिती अधिकारी, कर्मचा-यांना व्हावी यासाठीच प्रामुख्याने प्रबोधिनीचे कामकाज चालते. आता विभागीय पातळीवर अद्ययावत महसूल प्रबोधिनी उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यासाठी नाशिक शहराची निवड केली आहे. नाशिक येथेच विभागीय महसूल आयुक्त कार्यालय असून, विभागातील धुळे, नंदुरबार, धुळे, नगर व नाशिक जिल्ह्याच्या महसूलचे कामकाजावर नियंत्रण ठेवले जाते. त्यामुळे नाशिकची प्रबोधिनीसाठी निवड करण्यात आली आहे. साधारणत: पंधरा एकर क्षेत्रावर उभारण्यात येणा-या या प्रबोधिनीत अधिकारी, कर्मचाºयांच्या कायमस्वरूपी निवासाची सोय, प्रशिक्षण, कार्यशाळेसाठी स्वतंत्र सभागृहे, लेक्चरगृह, कॅन्टीन आदी सोयीसुविधा देण्यात येणार असून, त्यासाठी शासनाने ८० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या प्रबोधिनीसाठी नाशिक तालुक्यातील मुंगसरे येथे दहा एकर शासकीय जागा आरक्षित करण्यात आली. परंतु नाशिक शहरापासून मुंगसºयाचे अंतर अधिक असून, अशा ठिकाणी दळणवळणाची सोय तसेच अन्य सुविधाही उपलब्ध होण्यात अडचणी आहेत. त्यामुळे अन्य पर्यायी जागेचा शोध सुरू असताना दिंडोरीरोडवरील मेरी या संशोधन संस्थेच्या ताब्यातील जागा निश्चित करण्यात आली. आरटीओ कॉर्नरकडून जाणा-या रस्त्यावर मेरी संस्थेसाठी सुमारे १७ हेक्टर जागा पडीत असून, त्यातील सुमारे पंधरा एकर जागा प्रबोधिनीसाठी ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे. याठिकाणी मेरीच्या अधिकारी, कर्मचाºयांसाठी निवासस्थाने बांधलेली असून, त्याचा देखील प्रबोधिनीला फायदा होऊ शकतो या सर्व गोष्टींचा विचार करून प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. जागा ताब्यात मिळाल्यास तात्काळ बांधकामाला सुरूवात करण्यात येणार आहे.
नाशकात होणार विभागीय महसूल प्रबोधिनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 15:26 IST
महसूल अधिकारी व कर्मचा-यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात महसूल प्रबोधिनी असून, या प्रबोधिनीत महसूल अधिकारी, कर्मचा-यांना निवासी स्वरूपाचे प्रशिक्षण तसेच कार्यशाळांची सोय करण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रबोधिनीसाठी अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिका-यांची नियंत्रक म्हणून नेमणूक केली जाते
नाशकात होणार विभागीय महसूल प्रबोधिनी
ठळक मुद्दे८० कोटी निधी मंजूर : मेरीच्या जागेचा प्रस्ताव