विभागीय अधिकारी नावापुरतेच! नरेंद्र दंडगव्हाळ
By Admin | Updated: June 12, 2014 01:21 IST2014-06-12T01:20:51+5:302014-06-12T01:21:32+5:30
विभागीय अधिकारी नावापुरतेच! नरेंद्र दंडगव्हाळ

विभागीय अधिकारी नावापुरतेच! नरेंद्र दंडगव्हाळ
सिडको
महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयात सुमारे दोनशेहून अधिक कर्मचाऱ्यांचे प्रमुख असलेले विभागीय अधिकारी यांचा कर्मचाऱ्यांवर वचकच नाही. कोणत्याही विभागाची माहितीच नसल्याने विभागीय अधिकारी हे एक शोभेचेच पद असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
शहरातील सहा विभागांपैकी सर्वाधिक कर वसूल करणाऱ्या सिडको विभागीय कार्यालयाचे विभागीय अधिकारी आर. आर. गोसावी हे कामकाज बघतात. विशेष म्हणजे, गोसावी यांनी त्यांचा नोकरीचा बहुतांशी कार्यकाळही याच कार्यालयात घालविला आहे. आजमितीला या कार्यालयात घरपट्टी, पाणीपट्टी, बांधकाम, आरोग्य, विद्युत, भुयारी गटार, जन्म-मृत्यू, विवाह नोंदणी, एक खिडकी योजना, अतिक्रमण आदि विभाग मिळून सुमारे दोनशेहून अधिक कर्मचारी काम करतात. कर्मचाऱ्यांची कार्यालयात येण्याची वेळ ही सकाळी ९.४५ वाजेची असून, सायंकाळी ५.४५ वाजता सुट्टी असे वेळापत्रक आहे; परंतु विभागीय अधिकाऱ्यांचा कोणताही वचक अथवा धाक नसल्याने शिपायांपासून अधिकाऱ्यांपर्यंतच्या सर्वच कर्मचाऱ्यांना ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशीच परिस्थिती बघावयास मिळते. कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी ओळखपत्र सक्तीचे केले आहे; परंतु बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी ओळखपत्र लावतात. उशिराने कामावर हजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना हजेरी मस्टरवर केव्हाही सही करता येते. मनपाशी संबंधित कामकाज करण्यासाठी सिडकोवासीय कार्यालयात येतात; परंतु कर्मचारी जागेवर नसतात. त्यामुळे नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागते. जेवणाची सुट्टीची वेळ संपल्यानंतरही कर्मचारी उशीरा जागेवर येतात. या सर्व गोष्टींना ज्यांनी आवर घालायचा त्या विभागीय अधिकाऱ्यांकडूनच या घटनांकडे काणाडोळा केला जात असल्याचे दिसून येते.