मराठी चित्रपट महामंडळाची विभागीय समिती
By Admin | Updated: July 31, 2016 16:23 IST2016-07-31T16:23:01+5:302016-07-31T16:23:51+5:30
घटना दुरु स्ती, वेतन वाढी संदर्भात आढावा
मराठी चित्रपट महामंडळाची विभागीय समिती
नाशिक : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या नाशिक विभागीय समितीची स्थापना करण्यात आली असून, चित्रपट उद्योगातील फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी महामंडळाकडून निर्मात्यांसाठी आचारसंहिता अस्तित्वात आणण्यापासून विविध उपाय योजना करण्यात येणार असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी दिली.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या दोन दिवसीय शिखर बैठकीत महामंडळाच्या घटना दुरुस्तीविषयी तसेच तंत्रज्ञ व कलाकार यांच्या वेतन वाढीसंदर्भातही आढावा घेण्यात आल्याचे भोसले यांनी पत्र परिषदेत सांगितले. याप्रसंगी नवनिर्वाचित संचालक मंडळाची सदस्य अभिनेत्री वर्षा उसगावकर, अभिनेता विजय पाटकर, खजिनदार संजय ठुबे, निकिता मोघे, चैत्राली डोंगरे, रंजित जाधव, धनाजी यमकर, विजय पाटकर, सतीश बीडकर, सतीश रणदिवे, पितांबर काळे आदि उपस्थित होते. भोसले म्हणाले, सैराट चित्रपटाच्या यशानंतर विविध ठिकाणी आॅडिशनच्या निमित्ताने फसवणुकीचे प्रकार घडत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी महामंडळ प्रयत्न करणार आहे. यावेळी विभागीय समितीच्या सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली. यात समिती प्रमुख रवि बारटक्के, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, सुनील ढगे, श्याम लोंढे, सुनील परमार, रवि जन्नावार यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
नाशिकला प्रथमच बैठक
चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या भूमित महामंडळाच्या स्थापनेपासून प्रथमच महामंडळाच्या संचालकांची शिखर बैठक झाली. स्थानिक कलावंतांसोबत महामंडळाच्या कारभाराविषयीही चर्चा करण्यात आली. उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालयासाठी तसेच कलावंत व तंत्रज्ञांना मराठी चित्रपट सृष्टीच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करीत त्यांच्या समास्यांचे निराकरण करण्यासाठी व पारदर्शक कारभार याविषयी बैठकीत चर्चा झाली.
मराठी चित्रपटाचा व्यवसाय आणि आवाका वाढू लागल्याने महामंडळाची जबाबदारीही वाढली आहे. नवनिर्वाचित मंडळाच्या सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी व चित्रपटसृष्टीतील आॅडिशनच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीसारख्या गैरप्रकारांना आळा घालण्याच्या उद्देशाने निर्मात्यांसाठी विशेष आचारसंहिता निर्माण करण्यात येईल - वर्षा ऊसगावकर, संचालक, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ.
नशिकमध्ये कार्यालय सुरू करण्याच्या प्रयत्नांना यश आल्याने आणि या कार्यालयाचा कार्यभार पाहण्यासाठी समितीही गठीत झाल्याने विषेश आनंद झाला. स्थानिक कलाकारांसाठी महामंडळ नेहमीच प्रयत्नशील राहील. स्थानिक कलावंत तंत्रज्ञांनीही महामंडळाला मोठे करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. -विजय पाटकर, संचालक अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ.