मलनिस्सारणमुळे पसरली दुर्गंधी
By Admin | Updated: February 4, 2016 23:15 IST2016-02-04T23:14:29+5:302016-02-04T23:15:19+5:30
उपनगर, जेलरोडला आरोग्यास धोका : नगरसेवकांकडे तक्रारींचा ओघ

मलनिस्सारणमुळे पसरली दुर्गंधी
नाशिक : टाकळी येथील महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्रामुळे संपूर्ण जेलरोडसह उपनगर, टाकळी परिसरातील नागरिकांना दररोज दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. याप्रकरणी नागरिकांना स्थानिक नगरसेवकांकडे तक्रारी करूनही दुर्गंधीतून त्यांची सुटका झालेली नाही. दरम्यान, येथील मलनिस्सारण केंद्रातून नियमबाह्य पद्धतीने नदीपात्रात मलजल सोडले जात असल्यानेच दुर्गंधी पसरली असल्याचे बोलले जात आहे.
महापालिकेने टाकळीच्या पुढे नदीकाठी मलनिस्सारण केंद्र सुरू केले आहे. या केंद्रातून येणाऱ्या दुर्गंधीविषयी प्रारंभी लगतच्या नागरिकांकडून तक्रारी करण्यात येत होत्या. त्यावेळी काहीप्रमाणात हा त्रास कमी झाला; मात्र गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून दुर्गंधीची तीव्रता इतकी वाढली आहे की केवळ टाकळी आणि पगारे, जामकरमळा परिसरच नव्हे, तर संपूर्ण जेलरोड, उपनगर परिसरातील नागरिकांना तीव्र दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
जेलरोड, उपनगर परिसरातील नागरिकांना प्रारंभी दुर्गंधी कुठून येत आहे याची कल्पना नसल्याने अनेक सोसायटी, कॉलनीतील रहिवाशांनी आपापल्या इमारतीच्या सेफ्टी टॅँकची पाहणी केली, तर काहींनी ती साफही करून घेतली. तरीही दुर्गंधीचा त्रास कायम होता. उपाययोजना करूनही दुर्गंधी कायम राहिल्याने अनेकांनी नगरसेवकांकडे तक्रारी केल्या. प्रारंभी क्षुल्लक वाटणारी ही बाब गंभीर असल्याची कल्पना नागरिकांना नंतर आली. केवळ एकाच परिसरात नव्हे तर तीन ते चार किलोमीटरच्या परिघात दुर्गंधीचा त्रास पसरल्याने मलनिस्सारण केंद्रातूनच दुर्गंधी येत असल्याची बाब काही सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरसेवकांच्या निदर्शनास आणून दिली.
याप्रकरणी नगरसेवकांनी महापालिकेकडे पाठपुरावादेखील केला, परंतु लगेचच त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तक्रारीनंतरही दुर्गंधी कायम असून, नागरिकांना अजूनही सकाळ आणि सायंकाळी त्याचा सामना करावा लागत आहे. याप्रकरणी नागरिकांमध्ये आता तीव्र संतात व्यक्त केला जात असून, पालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा येथील सामाजिक संघटनांकडून देण्यात आला आहे.