शहरात डासांची घनता धोकादायक पातळीवर
By Admin | Updated: May 28, 2016 23:02 IST2016-05-28T22:46:27+5:302016-05-28T23:02:06+5:30
उपद्रव वाढला : धूर, औषध फवारणीची मागणीं

शहरात डासांची घनता धोकादायक पातळीवर
नाशिक : वाढत्या उष्णतामानामुळे मध्यंतरी शहरात डासांचे प्रमाण कमी झाले असतानाच बदलत्या वातावरणामुळे पुन्हा एकदा डासांचा उपद्रव वाढला असून, शहरात सिडको, सातपूर आणि नाशिकरोड परिसरात डासांची घनता धोकादायक पातळीच्या आसपास जाऊन पोहोचली आहे. डासांपासून मुक्तता मिळण्यासाठी धूर, औषध फवारणी वाढविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
दोन आठवड्यांपूर्वी शहरात वाढत्या तपमानामुळे डासांची संख्या कमी झाली होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरणामुळे पुन्हा एकदा डासांची प्रादुर्भाव वाढला असून, डासांची घनता ४.६५ पर्यंत जाऊन पोहोचली आहे. डासांची घनता पाचपेक्षा जास्त आढळून आल्यास धोकादायक स्थिती मानली जाते. मात्र दि. २० ते २६ मे या कालावधीत महापालिकेने मोजलेली घनता पाहता सिडको, सातपूर आणि नाशिकरोड परिसरात धोकादायक पातळीपर्यंत जाऊन पोहोचली आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक हैराण झाले असून, रात्रीची झोप उडाली आहे. प्रामुख्याने, तपोवन, दसक-पंचक परिसर, नांदूर-मानूर परिसर, टाकळीरोड या ठिकाणी गोदापात्रानजीक तसेच नासर्डी व वालदेवी नदी परिसरात डासांची घनता जास्त आढळून आली असून, महापालिकेने उपाययोजना करावी, अशी मागणी होऊ लागली आहे. मनपामार्फत डास प्रतिबंधक धूर व औषध फवारणी नियमित केली जात असल्याचा दावा केला जात असला तरी अशी फवारणी होतच नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.