ब्रेन मॅपिंग पुरावा मानण्यास नकार संशयित निर्दोष : न्यायालयाचा निर्णय
By Admin | Updated: March 10, 2015 01:05 IST2015-03-10T01:04:04+5:302015-03-10T01:05:39+5:30
ब्रेन मॅपिंग पुरावा मानण्यास नकार संशयित निर्दोष : न्यायालयाचा निर्णय

ब्रेन मॅपिंग पुरावा मानण्यास नकार संशयित निर्दोष : न्यायालयाचा निर्णय
नाशिक : खुनासारख्या गंभीर गुन्'ातही एखाद्या संशयित आरोपीने पॉलीग्राफी टेस्ट व ब्रेन मॅपिंग तपासणीत गुन्हा कबूल केला असला तरी, निव्वळ तेवढाच पुरावा संशयिताला शिक्षा देण्यास पुरेसा ठरत नसल्याचा निर्वाळा देत जिल्हा न्यायालयाने खुनाच्या आरोपातून दीपक राजाराम अहेर याची निर्दोष मुक्तता केली आहे. १९ आॅगस्ट २००७ मध्ये घडलेली ही घटना त्यावेळी शहरात चर्चेचा विषय ठरली होती. दीपक अहेर याने पत्नी स्वाती हिला घेऊन त्र्यंबकेश्वर येथे फिरण्याच्या बहाण्याने ब्रह्मगिरी डोंगरावर नेऊन दरीत ढकलून खून केल्याची तक्रार स्वातीची आई शोभा रामकृष्ण करंजकर यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणी प्रारंभी पोलिसांनी दीपक अहेर व त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध स्वातीस आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. मात्र फिर्यादी पक्षाने आग्रह धरल्याने संशयित आरोपी दीपक अहेर याची डायरेक्टर आॅफ फॉरेन्सिक सायन्स लॅब्रोटरी मुंबई येथे पॉलीग्राफीक टेस्ट व ब्रेन मॅपिंग चाचणी घेण्यात आली त्यात शास्त्रज्ञ व तज्ज्ञ नवाज इराणी यांनी आपला अहवाल देऊन त्यात दीपक अहेर याने पत्नी स्वाती हिचा डोंगरावरून लोटून खून केल्याचा कबुली जबाब दिला. त्यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते. या खटल्याची सुनावणी अतिरिक्तसत्र न्यायाधीश सौ. चव्हाण यांच्यासमोर होऊन दीपक अहेर यांच्या वतीने अॅड. उमेश वालझाडे यांनी युक्तीवाद केला. संशयित आरोपीच्या विरुद्ध ब्रेन मॅपिंग टेस्ट व पॉलीग्राफी शिवाय खून केल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले व त्यासाठी सॉल्वीविरुद्ध राज्य सरकार या सर्वोच्च न्यायालयच्या निवाड्याचा दाखला देण्यात आल्यावर न्यायालयाने ब्रेन मॅपिंग पुरावा मानण्यास नकार देऊन संशयिताची निर्दोष मुक्तता केली.