पंचवटीत डेंग्यूसदृश रुग्ण
By Admin | Updated: September 7, 2016 00:55 IST2016-09-07T00:54:30+5:302016-09-07T00:55:09+5:30
पंचवटीत डेंग्यूसदृश रुग्ण

पंचवटीत डेंग्यूसदृश रुग्ण
पंचवटी : पंचवटीत डासांचा प्रादुर्भाव वाढल्याची तक्रार लोकप्रतिनिधींनी प्रभाग समितीच्या बैठकीत करूनही महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने दिंडोरी रोडवरील कलानगर (गायत्रीनगर) देवराज संकुल येथे राहणाऱ्या एका १९ वर्षाच्या युवतीला डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याचे उघडकीस झाले आहे.
प्रभाग क्र मांक १ मध्ये राहणाऱ्या या युवतीला गेल्या सहा ते सात दिवसांपासून ताप येत असल्याने तसेच अशक्तपणा जाणवू लागल्याने तिला उपचारासाठी निमाणी बसस्थानकासमोरील खासगी रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत पंचवटी मनपा प्रशासनाचा संबंधित विभाग मात्र अनभिज्ञ आहे.
गेल्याच आठवड्यात हिरावाडी रोडवरील त्रिमूर्तीनगर परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला डेंग्यू झाल्याचे उघड झाले होते. त्यावेळी पंचवटी प्रभाग समितीच्या बैठकीत सभापती रुचि कुंभारकर यांनी डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करावी, अशा सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र तरीदेखील प्रशासनाने दखल घेतली नसल्याने मनपा प्रशासनाला कधी जाग येणार, असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे. (वार्ताहर)