शहरात यंदाही डेंग्यूचे संकट

By Admin | Updated: July 9, 2015 00:40 IST2015-07-09T00:40:41+5:302015-07-09T00:40:41+5:30

शहरात यंदाही डेंग्यूचे संकट

Dengue crisis in the city this year | शहरात यंदाही डेंग्यूचे संकट

शहरात यंदाही डेंग्यूचे संकट

शहरात यंदाही डेंग्यूचे संकटनाशिक : शहरात डेंग्यूच्या आजाराने मागील वर्षाप्रमाणे यंदाही डोके वर काढण्यास सुरुवात केली असून, आठवडाभरात विविध रुग्णालयांमध्ये सात रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यूचे संकट उभे राहिल्याने महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. महापालिकेने शहरात ठिकठिकाणी सर्वेक्षणास प्रारंभ करतानाच जनजागृतीच्या दृष्टीनेही पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
मागील वर्षी शहरात कधी नव्हे इतके डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले होते. पावसाळा संपल्यानंतरही डिसेंबर-जानेवारीपर्यंत डेंग्यूचे रुग्ण उपचारासाठी रुग्णालयांमध्ये दाखल होत होते. त्यावेळी सुमारे ४५० रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते, तर ११०० हून अधिक संशयित रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. महापालिकेने पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याला दिलेल्या वारंवार मुदतवाढीच्या खेळात शहरात डास प्रतिबंधक धूर व औषध फवारणीकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत त्यावेळी नगरसेवकांनी महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाला चांगलेच धारेवर धरले होते. डेंग्यूची भयावहता लक्षात घेता महापौरांनी डिसेंबरमध्ये विशेष महासभाही बोलाविली होती.
मागील वर्षी डेंग्यूच्या आजाराने शहरात घातलेले थैमान पाहता यंदा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढण्यास सुरुवात केल्याने नाशिककरांमध्ये घबराट पसरली आहे. आठवडाभरात शहरात विविध रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे सात रुग्ण दाखल झाले आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे झालेल्या नोंदीनुसार सहा संशयित रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, अद्याप त्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. या सहा रुग्णांमध्ये चार बाहेरील गावातील रुग्ण असून, दोन नाशिकमधील चेहेडी आणि गांधीनगरमधील इंदिरा गांधी झोपडपट्टीतील आहेत. (प्रतिनिधी)सिंहस्थ कुंभमेळा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना शहरात डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढल्याने महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून, लगेचच उपाययोजनांवर भर देण्यास सुरुवात केली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविक शहरात दाखल होणार असताना डेंग्यूच्या आजारावर आतापासूनच नियंत्रण मिळविण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे असणार आहे. रुग्णांच्या रक्तनमुने तपासणीसाठी लागणाऱ्या विलंबाबाबत मागील वर्षी महासभेत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. यंदा त्याची पुनरावृत्ती होणार नाही व शहरातच तपासणीची यंत्रणा उपलब्ध करून दिली जावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

Web Title: Dengue crisis in the city this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.