स्वाभिमानी शेतकरी संघटनेची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2015 00:08 IST2015-09-10T00:07:08+5:302015-09-10T00:08:34+5:30
दुष्काळ मागणी : प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची निदर्शने
नाशिक : पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून, त्याला दिलासा देण्यासाठी नाशिक जिल्हा तातडीने दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच ठिय्या मारून बसलेल्या कार्यकर्त्यांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले.
सकाळी दहा वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू करण्यात आले. जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करा, टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर सुरू करा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी व जिल्हा दुष्काळ जाहीर करण्यात यावा आदि मागण्या यावेळी आंदोलकांच्या वतीने करण्यात आल्या.
दुपारी तीन वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आंदोलनकर्ते आवारात जमा झाल्यावर अधिकाऱ्यांनी खाली येऊन निवेदन स्वीकारावे, असा आग्रह धरला; परंतु ते राजशिष्टाचाराला धरून नसल्याची बाब पुढे करीत अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळालाच दालनात येण्याची विनंती केली. त्यामुळे तणाव निर्माण होऊन अखेर आंदोलनकर्त्यांनी थेट पोर्चमध्येच ठाण मांडून जोरदार घोषणाबाजी सुरू केली. (प्रतिनिधी)
आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यातसरकारचा निषेध म्हणून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. दरम्यान, पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेऊन वीस ते पंचवीस आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.