दिंडोरी : जिल्ह्यात निर्माण झालेल्या कुपोषणाच्या प्रश्नाबाबत राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसतर्फे तहसीलदार कार्यालयासमोर कुपोषण मुक्तीसाठी निदर्शने करून मोर्चा काढला व तहसीलदारांना निवेदन दिले. जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यातील कुपोषणाचे संकट गडद झाले आहे. केंद्र सरकारने प्रातिनिधिक स्वरूपात केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कुपोषण आढळून आले ही मोठी शोकांतिका आहे. जिल्ह्यातील ४३ टक्के बालकांमध्ये कुपोषण आढळून आल्याने हा आकडा कुपोषणाचे गांभीर्य अधोरेखित करणारा आहे. जिल्ह्यात बऱ्यापैकी तालुके आदिवासी असून पालकांचे मोलमजुरीमुळे बालकांकडे दुर्लक्ष होते. आरोग्य विभागामार्फत कुपोषण निर्मुलनासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी. ग्रामीण भागातील गर्भवती माता व स्तनदा मातांना बालसंगोपणासाठी गावपातळीवर प्रशिक्षण आयोजित करण्यात यावे. अंगणवाडीतील बालकांना ताजा व सकस आहार देण्यात यावा अशा काही मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. या वेळी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पुष्पलता उदावंत, नीलिमा काळे, संध्या भागात, सायरा शेख, दिंडोरी शहराध्यक्ष कविता पगारे, संगिता ढगे, संगीता राऊत, सुनिता भरसट, रचना जाधव, शशिकला सुर्यवंशी, मंजुळा वड, चंद्रकला बर्वे, मंदा वाघ, हिराबाई पगारे आदिंसह महिला उपस्थित होत्या.
दिंडोरीत राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसतर्फे निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 14:40 IST