लोकनृत्यातून पूर्वांचलच्या लोकसंस्कृतीचे दर्शन
By Admin | Updated: November 10, 2014 01:07 IST2014-11-10T01:06:42+5:302014-11-10T01:07:16+5:30
लोकनृत्यातून पूर्वांचलच्या लोकसंस्कृतीचे दर्शन

लोकनृत्यातून पूर्वांचलच्या लोकसंस्कृतीचे दर्शन
नाशिक : स्वातंत्र्यसेनानी राणी मॉँ गाइदिन्ल्यू यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जु. स. रुंग्टा हायस्कूलमध्ये नागालॅण्ड व मिझोरामच्या कलावंतांनी लोकनृत्यातून पूर्वांचलच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडविले. यावेळी पूर्वांचलातील लोकांना समाजप्रवाहात आणण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून मदतीचे आवाहन करण्यात आले.वनवासी कल्याण आश्रम आणि नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यसेनानी राणी मॉँ गाईदिन्ल्यू यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक देवेंद्र बापट उपस्थित होते. यावेळी मिझोराम येथील जगदंब मल्ल यांनी पूर्वांचलावर इंग्रजांची असलेली पकड, तेथे होणारे धर्मांतर, राणी मॉँ गाइदिन्ल्यू यांनी केलेला संघर्ष आणि वनवासी कल्याण आश्रमामार्फत पूर्वांचलातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे होत असलेले प्रयत्न याबाबतची माहिती दिली. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष महेश दाबक यांनी सांगितले, पूर्वांचलाने स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान दिले आहे; परंतु तेथील समाजबांधव नेहमीच समाजजीवनापासून दूर ठेवला गेला. त्यांना वेगळी वागणूक देण्यात आली. वनवासींच्या कार्याचा आपण परिचय करून घेण्याची गरज असून, सामाजिक जाणिवा जागृत होण्याची आवश्यकता असल्याचेही दाबक यांनी सांगितले. नाशिकमध्ये पूर्वांचल विकास समितीमार्फत पूर्वांचलातील विद्यार्थिनींसाठी वसतिगृह चालविले जात असून, वनवानी कल्याण आश्रमाच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहनही दाबक यांनी केले. दरम्यान, पूर्वांचलातील २० कलावंतांनी नागा व खासी नृत्यप्रकार सादर करत उपस्थितांकडून दाद मिळविली. नाशिकमधील वसतिगृहातील मुलींनी खासी व हिंदी भाषेत स्वागतगीत व स्वागतनृत्य सादर केले. प्रास्ताविक किशोर सूर्यवंशी यांनी, तर सूत्रसंचालन विवेक पेंडसे यांनी केले. परिचय हर्षद ढाके यांनी करून दिला. व्यासपीठावर वनवासी कल्याण आश्रमाचे लातूर येथील पदाधिकारी आप्पाराव कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष सुहास देशमुख, प्रांत उपाध्यक्ष डॉ. आशुतोष माळी, नाशिक शहराध्यक्ष डॉ. बाबुलाल अग्रवाल, नाशिक शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी गजानन होडे, राकेश साळुंके, पूर्वांचलातील ताकीन झेव्ही, जामुमड कामयी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)