देहविक्रयचा अड्डा पोलिसांकडून उद््ध्वस्त
By Admin | Updated: January 17, 2016 23:05 IST2016-01-17T23:04:42+5:302016-01-17T23:05:31+5:30
गंजमाळ : व्यवसाय चालविणाऱ्या महिलेसह पाच तरुणी ताब्यात

देहविक्रयचा अड्डा पोलिसांकडून उद््ध्वस्त
नाशिक : अनेक वर्षांपासून शहरातील गंजमाळ येथे सुरू असलेला देहविक्रयचा अनधिकृत अड्डा अखेर पोलिसांनी रविवारी (दि.१७) दुपारी उद््ध्वस्त केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये येथील व्यवसाय चालविणाऱ्या मुख्य महिला सूत्रधारासह पाच तरुणींना पोलिसांनी अटक केली आहे.
गंजमाळ सिग्नलला लागूनच लाकडी खोल्या व पत्र्यांच्या शेडमध्ये वर्षानुवर्षांपासून बहुसंख्य वेश्या देहविक्रयचा अनधिकृत व्यवसाय करत होत्या. तसेच मद्यविक्रीचेही येथे दुकान असल्यामुळे काही मद्यपींकडून वारंवार भर रस्त्यात गोंधळ घातला जात होता. सिग्नलवर उभ्या राहणाऱ्या वाहनचालकांनादेखील मद्यपींकडून शिवीगाळ केली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता. येथील अवैध व्यवसायाबाबत अनेकदा पोलीस आयुक्त एस.जगन्नाथन यांना तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. जगन्नाथन यांच्या आदेशानुसार पोलीस उपआयुक्त एन.अंबिका, सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह एकूण तीस पोलीस कर्मचाऱ्यांनी गंजमाळ येथील देहविक्रय व्यवसायावर छापा मारला. पोलिसांनी व्यवसाय चालविणाऱ्या सुनीता सुभाष पवार (५०) या मुख्य महिला सूत्रधारासह पाच तरुणींना ताब्यात घेतले आहे. पवारवर भद्रकाली पोलीस ठाण्यात अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या पाचही तरुणींची वात्सल्य महिला वसतिगृहात रवानगी करण्यात आल्याचे कड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)