पानेवाडी प्रकल्पात प्रात्यक्षिक

By Admin | Updated: August 26, 2016 21:52 IST2016-08-26T21:52:06+5:302016-08-26T21:52:24+5:30

भारत पेट्रोलियम : सुरक्षेसाठी उपकरणे, यंत्रणेची तपासणी

Demonstration of the Panewadi Project | पानेवाडी प्रकल्पात प्रात्यक्षिक

पानेवाडी प्रकल्पात प्रात्यक्षिक

 मनमाड : वेळ दुपारी साडेअकरा वाजेची. पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम कंपनीत धोक्याचा सायरन वाजतो व सर्वांची एकच धावपळ उडते. प्रकल्पातील इंधन भरून झालेल्या टँकरच्या व्हॉल्व्हमधून गळती होऊन आग लागल्याची सूचना नियंत्रण कक्षाकडून देण्यात येते. अग्निशमन दल, सहायक दल व बचाव दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचतात. जवाची पर्वा न करता फोम व पाण्याच्या फवाऱ्यांनी अवघ्या १५ मिनिटात आग आटोक्यात आणण्यात यश मिळते व हिरवा झेंडा फडकवून धोका टळल्याचा संदेश देण्यात येतो.
सदरची दुर्घटनेतील आग ही खरी नसून अचानक अशी घटना घडल्यास सुरक्षा यंत्रणा किती सक्षम आहे याची चाचणी घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेले प्रात्यक्षिक असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
मनमाडजवळील पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम प्रकल्पामध्ये चित्तथरारक प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. सुरक्षा यंत्रणा तसेच आगीवर नियंत्रण मिळवणारी उपकरणे व यंत्रसामग्रीची गुणवत्ता व परिस्थिती तपासण्यासाठी वर्षातून दोन वेळा आपत्कालीन आग प्रतिबंधक प्रात्यक्षिकांचे आयोजन इंधन कंपन्यांमध्ये केले जाते. प्रकल्प प्रबंधक देवीदास पानझाडे यांनी उपस्थित परीक्षकांचे स्वागत करून प्रकल्पाची व्याप्ती तसेच सुरक्षा साधने व उपाययोजनांची माहिती दिली़ यावेळी भारत पेट्रोलियमचे प्रकल्प व्यवस्थापक देवीदास पानझाडे, औद्योगिक उपसंचालक आर.डी. दहीफळे, जी.पी. जोशी, महिद्रा कंपनीचे हरिष चोबे, आर.के. गुप्ता, सरपंच अशोक पवार, अमित पारसे, मनोज नलावडे, अनिल मोरे, पंकज जेजुरकर आदि अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Demonstration of the Panewadi Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.