महानगरपालिकेचे १४१० कोटींचे अंदाजपत्रक स्थायीला सादर
By Admin | Updated: April 17, 2017 18:30 IST2017-04-17T18:30:42+5:302017-04-17T18:30:42+5:30
अस्तित्वातीलच मालमत्ता व प्रकल्पांच्या देखभाल-दुरुस्तीवर भर देण्याचे ठरवत सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी १४१०.०७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक

महानगरपालिकेचे १४१० कोटींचे अंदाजपत्रक स्थायीला सादर
नाशिक : नाशिक महानगरपालिकेची खालावलेली आर्थिक स्थिती लक्षात घेता कोणत्याही नव्या संकल्पना अथवा प्रकल्पांची मांडणी करण्याचे धाडस न दाखवता अस्तित्वातीलच मालमत्ता व प्रकल्पांच्या देखभाल-दुरुस्तीवर भर देण्याचे ठरवत सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी १४१०.०७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक प्रभारी आयुक्त बी. राधाकृष्णन् यांनी सोमवारी (दि.१७) स्थायी समितीला सादर केले. अंदाजपत्रकात उत्पन्नवाढीसाठी मिळकतकरात सुमारे १४ टक्के तर पाणीपुरवठा करामध्ये ५ टक्के दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. दरम्यान, शिक्षण समितीसाठी ५५ कोटी तर वृक्षप्राधिकरण समितीसाठी ५२.८६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
यंदा महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमुळे सुमारे दोन महिने विलंब झालेले सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांना सादर करण्यात आले. आता येत्या गुरुवारी (दि.२०) स्थायी समितीने अंदापत्रकावर चर्चा करण्यासाठी विशेष सभा बोलाविली आहे. महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण हे प्रशिक्षणासाठी मसुरी येथे गेले असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत प्रभारी कार्यभार सांभाळणारे जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांनी अंदाजपत्रक सादर केले. आयुक्तांनी सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाचे १४०२.४६ कोटी रुपयांचे सुधारित आणि ५.९८ कोटी रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक सादर करतानाच सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी १४१०.०७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायीला सादर केले. मागील वर्षी १३५७.९६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर झाले होते. प्रत्यक्ष जमा मात्र १४०२.४६ कोटी रुपये झाले. यंदा अंदाजपत्रकात गतवर्षाच्या तुलनेत ५१.११ कोटींनी वाढ सुचविलेली आहे.