जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविले स्पष्टीकरण
By Admin | Updated: April 9, 2017 00:53 IST2017-04-09T00:52:56+5:302017-04-09T00:53:05+5:30
नाशिक : तरुणांना नोकरीचे आमिष दाखविणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील रवींद्र मोरे या अव्वल कारकुनाची माहिती पोलिसांनी मागविली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविले स्पष्टीकरण
नाशिक : मालेगाव तालुक्यातील तरुणांना शासकीय नोकरीचे आमिष दाखविणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील रवींद्र मोरे या अव्वल कारकुनाची माहिती मालेगावच्या पोलिसांनी मागविली असून, मोरे याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच उमेदवारांना बनावट नियुक्तीपत्रे वाटप केल्याने या साऱ्या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील कूळ कायदा शाखेत अव्वल कारकून असलेल्या रवींद्र मोरे याच्यासह त्याच्या पाच साथीदारांना मालेगाव पोलिसांनी फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक केली असून, मोरे याने जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांच्या नावे बनावट नियुक्तीपत्रे दिली आहेत. या नियुक्तीपत्रांची सत्यता तपासून पाहण्यास पोलिसांनी सुरुवात केली असून, हस्तगत करण्यात आलेल्या पत्रांची प्रत जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांकडे पाठवून त्यावर मारण्यात आलेले शिक्के कार्यालयातीलच आहेत काय याची खात्री करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे.
गेल्या वर्षीच जिल्हाधिकारी कार्यालयात अशा प्रकारे वाहनचालक तसेच लिपिकांच्या नेमणुकीची नियुक्तीपत्रे वाटप केली जात असल्याची कुणकुण होती, तथापि, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे रवींद्र मोरे याचे चांगलेच फावले. महसूल खात्यात वाहनचालक म्हणून नोकरी देण्यासाठी मोरे याने सात लाख रुपये घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात राजेंद्र शेवाळे या उमेदवारास नियुक्तीपत्र दिले होते. परंतु या नियुक्तीपत्राविषयी संशय आल्याने शेवाळे याने पोलिसांत धाव घेतली. रवींद्र मोरे याचे सहकारी बंडू बाबुराव सूर्यवंशी, सीताराम निकम, विनायक शेट्टी, श्रीकांत पाळदे या चौघांनाही मालेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (प्रतिनिधी)