अपहरण करून दोन लाखांच्या खंडणीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 11:02 PM2018-07-31T23:02:40+5:302018-08-01T00:13:16+5:30
दोन मित्रांच्या मदतीने वाहनातून घेऊन जात गुदामामध्ये डांबून ठेवून दोन लाखांची खंडणी मागितल्याची घटना अंबड लिंकरोड परिसरात रविवारी (दि़२९) रात्रीच्या सुमारास घडली़
नाशिक : दोन मित्रांच्या मदतीने वाहनातून घेऊन जात गुदामामध्ये डांबून ठेवून दोन लाखांची खंडणी मागितल्याची घटना अंबड लिंकरोड परिसरात रविवारी (दि़२९) रात्रीच्या सुमारास घडली़ अंबडमधील सनशाइन पार्कमधील नूरउल्ला मतीउल्ला खान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित फकरुद्दीन खान हा तीन महिन्यांपासून फोनवर धमक्या देऊन पैशांची मागणी करीत होता़ यानंतर रविवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास संशयित फकरुद्दीन व त्याच्या दोन मित्रांनी जबरदस्तीने त्यांच्या वाहनातून नूरउल्ला खान यास घेऊन जात अंबड लिंक रोडवरील गुदामामध्ये डांबून ठेवत दोन लाखांची मागणी केली़ याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कत्तलीसाठीच्या गायींची सुटका
वडाळा नाका येथील कसाई वाड्यात कत्तलीसाठी बांधलेल्या तीन गायींची भद्रकाली पोलिसांनी शनिवारी (दि़२८) रात्रीच्या सुमारास सुटका केली़ याप्रकरणी पोलिसांनी संशयित नवाब अब्दुल रहमान कुरेशी (रा. कुरेशीवाडा, वडाळा नाका) यास अटक केली असून, भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
चौघा जुगाऱ्यांवर कारवाई
देवी चौकात जुगार खेळणाºया चौघांना पोलिसांनी रविवारी (दि़२९) सायंकाळी ताब्यात घेतले़ उमेश धनगर (४३, रा. सिन्नर फाटा), हारून भिकन शेख (४३), दिलावर अब्दुल पठाण (४३, दोघे रा. सिन्नर फाटा), सचिन कैलास सोनवणे (३४, रेल्वे क्वार्टर, नाशिकरोड) हे पत्त्यांवर जुगार खेळत होते़ पोलिसांनी या चौघा संशयितांकडून ५७० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे़ याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
विनयभंग करून दिली धमकी
घरी आलेल्या पाहुण्यास चहा करण्यासाठी स्वयंपाकगृहात गेलेल्या महिलेचा पाहुण्याने विनयभंग करून धमकी दिल्याची घटना नाशिकरोड परिसरात घडली़ याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून संशयित अनिल संपत वाटपाडे (रा. पाचोरे वणी, ता. निफाड) विरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पानटपरी फोडून चोरी
कॉलेजरोडच्या थत्तेनगररोडवरील विनय अपार्टमेंटमधील दुर्गा पान शॉप फोडून चोरट्यांनी रोख रक्कम व डीव्हीआर असा ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला़ याप्रकरणी दिवाकर रुक्मैया कलाल यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
गोमांस विक्रेत्यास अटक
४भद्रकाली परिसरात बेकायदेशीररीत्या गोवंशीय प्राण्याचे मांस विक्री करीत असलेल्या शकील रशीद शेख (२२, रा. नानावली, भद्रकाली) या संशयितास रविवारी (दि़२९) दुपारी पोलिसांनी अटक केली़
धात्रक फाटा येथून दुचाकीची चोरी
आडगावच्या धात्रक फाट्यावरील नवआकाश सोसायटीतील रहिवासी महेंद्र पांडुरंग सूर्यवंशी यांची ७० हजार रुपये किमतीची यामाहा एफझेड दुचाकी (एमएच १५, जीजे २३९५) सोसायटीच्या पार्किंगमधून चोरून नेली़ याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.