शिक्षकाच्या मागणीसाठी डोंगरगावी धरणे आंदोलन
By Admin | Updated: July 4, 2016 22:59 IST2016-07-04T22:57:30+5:302016-07-04T22:59:17+5:30
शिक्षकाच्या मागणीसाठी डोंगरगावी धरणे आंदोलन

शिक्षकाच्या मागणीसाठी डोंगरगावी धरणे आंदोलन
लोहोणेर : डोंगरगाव येथील प्राथमिक शाळेत गेल्या दोन वर्षांपासून पदवीधर शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी हेळसांड होत असून, जोपर्यंत पदवीधर शिक्षकाची नेमणूक होत नाही तोपर्यंत देवळा पंचायत समितीच्या आवाराबाहेर धरणे आंदोलनास बसलेल्या डोंगरगाव ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना दोन दिवसात शिक्षकाची नेमणूक केली जाईल, असे लेखी आश्वासन गटशिक्षण अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.
डोंगरगाव येथील प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग असून, ३५०च्या वर पटसंख्या आहे. पटसंख्येनुसार मुख्याध्यापकासह सात शिक्षकांची गरज असताना सध्या मुख्याध्यापक धरून सहाच शिक्षक आहेत. संतप्त ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी ११ वाजता देवळा पंचायत समितीच्या आवाराबाहेर भरपावसात धरणे आंदोलन सुरू केले. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती केदा अहेर यांनी आंदोलनकर्त्यांची भूमिका समजावून घेत गटविकास अधिकारी सी. एल. पवार यांच्या दालनात गटशिक्षण अधिकाऱ्यांशी चर्चा केली. धरणे आंदोलनात डोंगरगावच्या सरपंच सुनीता सावंत, भगवान सावंत, संजय पानसरे, विठ्ठल सावंत, रमेश सावंत, दीपक सावंत, कैलास अहिरे, विलास सावंत, लालजी सावंत, हिरामण सावंत, अंजनाबाई सोनवणे आदि सहभागी झाले होते. (वार्ताहर)