स्वॅप मशीनला मागणी
By Admin | Updated: November 16, 2016 01:05 IST2016-11-16T01:09:19+5:302016-11-16T01:05:46+5:30
पर्यायाची चाचपणी : दुकानदार, व्यावसायिकांकडून स्थानिक शाखांमध्ये अर्ज

स्वॅप मशीनला मागणी
नाशिक : केंद्र सरकारने मोठ्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाचा बाजारातील रोखीच्या व्यवहारांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे दुकानदार व्यावसायिकांकडून चलनी नोटांच्या पर्यायांची चाचपणी सुरू केली असून, अनेकांनी स्वॅप मशीन घेण्यासाठी बँकांकडे मागणी अर्ज के ला आहे. सद्यस्थितीत विविध बँकांचे अधिकारी ग्राहकांना नोटा बदलून देणे आणि ग्राहकांच्या इतर समस्यांमध्ये गुंतले असले तरी व्यवहार पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी स्वॅप मशीन महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याने अधिकाऱ्यांनी स्वॅप मशीन वितरित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू केली आहे.
शहरातसह संपूर्ण जिल्हाभरात नोटांवरील बंदीमुळे सुट्या पैशांचा प्रश्न निर्माण झाले असून, अगदी दोनशे तीनशे रुपयांचे व्यवहार करणेही अडचणीचे बनले आहे. अशा परिस्थिीतीत दुकानदार व्यावसायिकांचे काम बंद पडण्याची वेळ आली आहे. यावर मात करण्यासाठी दुकानदारांनी स्वॅप मशीनचा पर्याय निवडला आहे. सद्यस्थितीत डेबिट कार्डधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या खात्यावर पैसेही आहे; मात्र केवळ बँकेच्या रांगेत उभे राहून पैसे काढण्यात अडचणी येत असल्याने नागरिकांनी काही दिवस केवळ अतिआवश्यक व्यवहार करण्याचेच धोरण स्वीकारले आहे.
स्वॅप मशीनद्वारे व्यवहार सुरू झाल्यास दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर येण्यास मदत होणार असल्याची व्यावसायिकांना अपेक्षा आहे. दरम्यान, बाजारात मोबाइल अॅप वापरण्याचाही अनेकांनी प्रयत्न केला; मात्र अॅप वापरताना अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याचे समोर आले असून, मोबाइल अॅप सर्वश्रुत नसल्याने या माध्यमातून व्यवहार करणे अवघड असल्याचे मत दुकानदारांनी व्यक्त केले. (प्र्रतिनिधी)