द्राक्षबागा वाचविण्यासाठी योजना सुरू करण्याची मागणी
By Admin | Updated: May 10, 2015 23:57 IST2015-05-10T23:45:49+5:302015-05-10T23:57:22+5:30
द्राक्षबागा वाचविण्यासाठी योजना सुरू करण्याची मागणी

द्राक्षबागा वाचविण्यासाठी योजना सुरू करण्याची मागणी
नाशिक : नाशिक जिल्ह्यात द्राक्ष पिकासाठी अनुकूल परिस्थिती असूनही सततच्या होत असलेल्या अवकाळी पाऊस व आपत्तीमुळे द्राक्ष बागाईतदारांना संकटांचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे द्राक्षबागांच्या बचावासाठी द्राक्षबागांच्या प्लास्टिक आच्छादनाकरिता सहाय्य करण्यासाठी नवीन योजना सुरू करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयात २०१५ खरीप पूर्व हंगामाच्या बैठकीस आलेल्या पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
आमदार जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे की, अवेळी पडणारा पाऊस, गारपीट, द्राक्ष पक्वतेच्या वेळी तपमानात झालेली घट, अति बाष्पाचे प्रमाण, तीव्र सूर्यप्रकाश आणि हवामानातील बदलामुळे द्राक्षबागेवर बरेचवेळा अनिष्ठ परिणाम होऊन द्राक्ष बागाईतदार शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. मात्र या संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडून पुरेसा निधी मिळत नसल्याने त्यांच्या बागा वाचविण्यासाठी प्लास्टिक आच्छादनाकरिता सहाय्य करण्यासाठी योजना सुरू करण्यात यावी. तसेच गेल्या वर्षात कांदा बि-बियाणे ६० टक्के खराब निघाल्याने शेतकरीवर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने पुढील वर्षात ते बियाणे प्रमाणित करून मगच त्याचे वितरण करण्यात यावे निवेदनात म्हटले आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत दुष्काळसदृश परिस्थितीत बहुवार्षिक फळपिके वाचविण्यासाठी ज्या उपाययोजना करावयाच्या आहे. त्यासाठी शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध नाही. तसेच तेल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील डाळिंबाच्या क्षेत्रात घट होत आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सन २०१० पासून कृषिपंपाच्या विद्युत कनेक्शनसाठी अनामत रक्कम भरल्या असताना त्यांना आजतागायत वीज कनेक्शन देण्यात आले नसल्याचे त्यांनी निवेदनात शेवटी म्हटले आहे.