पीककर्जाचे व्याजदर पूर्ववत करण्याची मागणी

By Admin | Updated: September 26, 2016 01:03 IST2016-09-26T01:03:18+5:302016-09-26T01:03:47+5:30

नायगाव : शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Demand for reversal of interest rate for crop loans | पीककर्जाचे व्याजदर पूर्ववत करण्याची मागणी

पीककर्जाचे व्याजदर पूर्ववत करण्याची मागणी

नायगाव : युनियन बॅँक आॅफ इंडियाने शेतकऱ्यांच्या पीककर्जाचे व्याजदर पूर्ववत करण्याची मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नायगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे.
सिन्नर तालुक्यातील नायगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या गोदा युनियन कृषक सेवा सहकारी संस्थेला अनेक वर्षांपासून युनियन बॅँकेमार्फत कर्ज पुरवठा   केला जातो. मात्र, या बॅँकेने  एप्रिल २०१६ पासून पीककर्ज व्याजदराच्या नवीन धोरणानुसार ७ ऐवजी ११.६५ टक्के व्याजदराने गोदा युनियन संस्थेस कर्जपुरवठा केला आहे. त्यामुळे गोदा युनियनच्या सभासद शेतकऱ्यांना एप्रिलपासून तब्बल १४ टक्के व्याजदराने कर्ज घ्यावे लागत असल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
वाढलेल्या व्याजदराबाबत शेतकऱ्यांचा रोष ओळखून गोदा युनियन कृषक संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण सांगळे व संचालक मंडळाने युनियन बॅँकेच्या पदाधिकाऱ्यांकडे पीककर्जाचे व्याजदर पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. मात्र, तीन-चार महिन्यांमध्ये संबंधितांकडून यावर निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
एकीकडे शासन शेतकऱ्यांची कोंडी करत आहे, तर दुसरीकडे बॅँकांकडून वाढीव व्याजदर आकारुन शेतकऱ्यांची पिळवणून केली जात असल्याची शेतकऱ्यांची भावना  आहे. शासनाने शेतकऱ्यांना कमी दरात व तत्काळ कर्ज पुरवठा करण्याचे आदेश दिले असताना युनियन बॅँक मात्र शेतकऱ्यांना ज्यादा दराने कर्ज देण्यास भाग पाडत आहे. असे असताना युनियन बॅँक स्वत: शेतकऱ्यांना ७ टक्के व्याजदरानेच कर्जवाटप करत असल्याने गोदा युनियनच्या सभासद शेतकऱ्यांमध्ये अन्यायाची भावना व्यक्त होत आहे. युनियन बॅँकेने पीककर्जाचे वाढीव व्याजदर कमी करुन ते पूर्ववत करण्याची मागणी लवकरात लवकर मान्य केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे. (वार्ताहर)
शेतकरी बनले बॅँकेचे खातेदार
संस्था स्थापनेपासून संस्थेला युनियन बॅँकेकडून कर्ज पुरवठा केला जातो. संस्था दत्तक घेतेवेळी बॅँकेने संस्थेच्या कार्यक्षेत्रात थेट कर्जपुरवठा करायचा नाही असा करार असताना गेल्या काही वर्षांपासून परिसरातील व संस्थेतील राजकारणाचा फायदा उचलत बॅँकेने संस्थेच्या सभासदांना वाढीव पीककर्ज देत आपलेसे करण्याचा डाव सुरु केला. त्यामुळे गेल्या काही दिवसांत कार्यक्षेत्रातील अनेक शेतकरी बॅँकेचे खातेदार बनले आहे. त्यामुळे सहकारी संस्थेच्या आर्थिक व्यवहारांवर परिणाम होवू लागला आहे. त्यातच देशभरात कोठेच शेतकऱ्यांना १४ टक्के पीककर्जाचा व्याजदर नसताना एकमेव युनियन बॅँकेने शेतकरीविरोधी पाऊल उचलल्याने तो परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.
युनियन बॅँकेने नवीन धोरणानुसार शेतकऱ्यांच्या पीककर्जाच्या व्याजदरात दुपट्टीने वाढवून शेतकऱ्यांबरोबर संस्थेला अडचणीत टाकण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. सध्या शेतकरी आसमानी बरोबरच सुलतानी संकटांना तोंड देताना आर्थिक अडचणीत सापडला असतांना युनियन बॅँकेच्या वाढीव व्याजदराच्या निर्णयाने सभासद शेतकऱ्यांवर जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे. पीक कर्जाचे व्याजदर पूर्ववत (७ टक्के) केले नाही तर परिसरातील शेतकरी आंदोलन करतील.
- लक्ष्मण सांगळे,
अध्यक्ष, गोदा युनियन, नायगाव

Web Title: Demand for reversal of interest rate for crop loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.