दाभाडी : मालेगाव तालुक्यातील व परिसरातील ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्याने पुनंदचे पाणी गिरणा नदीत सोडण्याची मागणी नाशिक पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.मालेगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याची सोय गिरणा नदी काठावरील विहिरींद्वारे केली जाते. मात्र सध्या एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच विहिरींनी तळ गाठला असल्याने ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करण्यास अडचण निर्माण होत आहे. अनेक गावांतील शेतकरी कुटुंब हे कोरोनाच्या प्रादुर्भावाने संरक्षणासाठी स्वत:च्या शेतात राहण्यासाठी गेले आहेत. तसेच सदर शेतकऱ्यांना जनावरांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. विहिरींनी तळ गाठला असल्याने टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील मौजे टेहरे, चंदनपुरी, कौळाणे, मुंगसे दाभाडी, आघार बु, आघार खु, चिंचावड, वाके, नांदगाव बु येथील पिण्याच्या पाण्यासाठी, गुरांसाठी व सिंचनासाठी गिरणा नदी काठालगत विहिरी आहेत मात्र सदर विहिरींनी तळ गाठल्याने अडचण निर्माण झाली आहे. संबंधित ग्रामपंचायत पाणीपट्टी भरण्यास तयार आहेत म्हणून पालकमंत्री यांनी आपल्या अधिकाराचे आरक्षित असलेले पुनंद बंधाºयातील पाणी मालेगावपर्यंत त्वरित सोडल्यास सदर प्रश्न निकाली लागेल व परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर होईल, अशी मागणी करण्यात आली आहे. यास्तव जिल्हाधिकारी नाशिक यांना आदेश देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
पुनंदचे आरक्षित पाणी गिरणा नदीत सोडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 23:07 IST